पत्नीचा खून करुन मृतदेह पेट्रोल टाकून पेटविला; चारित्र्याच्या संशयातून घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 04:00 PM2020-02-23T16:00:04+5:302020-02-23T16:01:04+5:30
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून केला. यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरुन एका रस्त्याच्या कडेला नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना राहाता तालुक्यातील एकरुखे येथे घडली आहे. पोलिसांनी पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
राहाता : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून केला. यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरुन एका रस्त्याच्या कडेला नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना राहाता तालुक्यातील एकरुखे येथे घडली आहे. पोलिसांनी पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मयत महिलेचा भाऊ सुनील आप्पासाहेब तरस (वय ३३, रा.खैरी निमगाव, ता.श्रीरामपूर) यांनी राहाता पोलिसात फिर्याद दिली आहे. माझी बहीण छाया सुनील लेंडे (वय ३२, रा एकरुखे) हिचा २००८ साली एकरुखे येथील सुनील जनार्धन लेंडे याच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर दोन वर्षांनी तिचा पती सुनील व तिच्यात चारित्र्याच्या संशयावरुन नेहमी वाद सुरु होते. त्यांना तीन मुले आहेत. शनिवारी (दि.२२ फेब्रुवारी) संध्याकाळी ४ वाजता सुनील हा छाया हिला घेऊन शेतात घास कापण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. छाया हिने घास कापण्यास सुरुवात केल्यानंतर पाठीमागून सुनीलने तिच्या डोक्यात लाकडी दांड्याने जोराचा फटका मारुन तिचा खून केला. यानंतर तो छाया हिचा मृतदेह तेथेच शेतात ठेऊन तो घरी आला. त्याने आपल्या आई, वडिलांना सांगितले की, रुई गावचा पाहुणा मयत झाल्याने तुम्ही मुलांना घेऊन रुईला जा. मी पाठीमागून येतो. असे सांगून घरच्यांना त्याने गावी पाठवून दिले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तो शेतात पोते व पेट्रोल घेऊन गेला. छाया हिचा मृतदेह पोत्यात भरुन आपल्या मालकीच्या शेतापासून एक किलोमिटर दूर अंतरावरील नपावाडी रोडवर घेऊन गेला. तेथे पोत्यातील मृतदेह रस्त्याच्या कडेला ठेऊन त्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी स्वत:हून पोलीस स्टेशनला हजर
घटनेनंतर आरोपी सुनील लेंडे हा राहाता पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाला. पोलिसांना त्याने घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस तातडीने त्याला घेऊन घटनास्थळी आले. यावेळी त्याची पत्नी छाया हिचा मृतदेह जळत होता. पोलिसांनी इतरांच्या मदतीने आग विझविली. मृतदेह लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनाकरीता पाठवून दिला. यानंतर आरोपीविरुध्द राहाता पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये हे करीत आहेत.