भाऊबीजेच्या करदो-यासाठी राबतात मुस्लिम हात; चिचोंडी पाटील येथे अनेक वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 04:00 PM2019-10-13T16:00:34+5:302019-10-13T16:01:14+5:30
हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असलेल्या दिवाळीतील भाऊबीजेसाठी बनविला जाणारा करदोरा चिंचोडी पाटील (ता. नगर) येथील मुस्लिम कुटुंबीय बनवितात. येथील ही हिंदू-मुस्लिम ऐक्याची गेल्या अनेक वर्ष सुरू असलेली परंपरा आजही कायम आहे.
संजय ठोंबरे ।
चिचोंडी पाटील : हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण असलेल्या दिवाळीतील भाऊबीजेसाठी बनविला जाणारा करदोरा चिंचोडी पाटील (ता. नगर) येथील मुस्लिम कुटुंबीय बनवितात. येथील ही हिंदू-मुस्लिम ऐक्याची गेल्या अनेक वर्ष सुरू असलेली परंपरा आजही कायम आहे.
दिवाळीमध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा (पाडवा), भाऊबीज असे वेगवेगळे उत्सव असतात. त्यात प्रत्येकाचे एक वेगळे असे महत्त्व आहे. यातील एक म्हणजे भाऊबीज हा महत्त्वाचा उत्सव असतो. हा दिवस बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचं प्रतीक मानले जाते. या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. आपल्या भावास कुंकूवाचा टिळा लावून ओवाळते. सोबत त्याच्या रक्षणार्थ करदोरा देते. या काळात असे करदोरे सहज उपलब्ध होतात. हे करदोरे म्हणजे अनेक मुस्लिम कुटुंबांच्या परिश्रमाचे फलित असते. हे किचकट काम दिवाळीच्या काम आठ महिने अगोदरच सुरू होते. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील मुस्लिम कुटुंबीय अनेक वर्षांपासून करदोरे बनविण्याचे काम करत आहेत.
दिवसातील बारा ते पंधरा तास एका जागेवर बसून हे काम करावे लागते. सध्या कारागिरांची करदोरे बनविण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. काळ्या व लाल अखंड गोपाचे वेगवेगळ्या लांबीचे तुकडे करण्यासाठी येथील कारागिरांनी त्यांच्या संकल्पनेतून यंत्रे बनविली आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दुस-या दिवसापासून वेगवेगळ्या गावात, शहरात जाऊन हे करदो-यांची विक्री केली जाते. करदोरा विक्री सुमारे महिनाभर चालते. येथील करदो-यांना मुंबई, नवी मुंबई, पुणे, बीड, नगर जिल्ह्यातून मोठी मागणी असते.
नव्या पिढीची व्यवसायाकडे पाठ...
करदोरा तयार करण्याचा आमचा पिढीजात व्यवसाय आहे. परंतु नवीन पिढीने या व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. त्यांचा अन्य व्यवसायाकडे कल वाढत आहे. करदोरा तयार करताना तो पूर्ण होईपर्यंत पाचवेळा हाताळला जातो. बैठ्या कामामुळे गुडघेदुखी, पायास सूज येणे असे विकार जडतात, असे करदोरा कारागीर रफिक मनियार यांनी सांगितले.
महिला गृह उद्योगात समावेश करा
आठ महिने चालणा-या या व्यवसायाचा महिला गृह उद्योगामध्ये समावेश व्हावा. यासाठी कर्ज पुरवठा झाल्यास उद्योगास चालना मिळेल. गरीब कुंटुंबांना हातभार लागेल, अशी अपेक्षा करदोरे बनविणा-या महिला कारागिरांनी व्यक्त केली.