फोनवर मुस्लिम महिलेस ‘तलाक’; पतीविरूद्ध मुस्लिम महिला विवाह कायद्याने गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 10:57 AM2020-11-22T10:57:36+5:302020-11-22T10:58:59+5:30
पत्नीला फोनवरच ‘तलाक’ म्हणत सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेल्या पतीविरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मुस्लिम महिला विवाह कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० नोव्हेंबर रोजी ही घटना मुकुंदनगर येथे घडली.
अहमदनगर : पत्नीला फोनवरच ‘तलाक’ म्हणत सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेल्या पतीविरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मुस्लिम महिला विवाह कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० नोव्हेंबर रोजी ही घटना मुकुंदनगर येथे घडली.
याप्रकरणी सदफ शेख (वय ३१, रा. सीआयव्ही कॉलनी, मुकुंदनगर) यांनी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी नोकरीनिमित्त दुबई येथे होते. १४ नोव्हेंबर रोजी मी परत भारतात आले. घरी आल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास आपण पती गुलाम दिन शहा (वय ३२, मूळ राहणार जम्मू काश्मीर, हल्ली जोगेश्वरी, मुंबई) यांना फोन केला. त्यावर त्यांनी ‘तू इंडिया मे आ गई क्या! तू इंडिया क्यू आई, मेरा तेरे से और बेटी से कुछ रिश्ता नही, मुझे तेरे साथ संबंध नही रखना, मैने तुझे तलाक दिया है’ असे म्हणत फोन बंद करून टाकला व फोनवरच तलाक शब्द बोलून मुस्लिम महिला विवाह कायदा कलम ३चे उल्लंघन केले.
अशा फिर्यादीवरून भिंगार पोलिसांनी फिर्यादीचा पती गुलाम दिन शहा याच्याविरोधात मुस्लिम महिला विवाह अधिकाराचे संरक्षण अधिनियम २०१९चे कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.