‘त्यांच्या’ रडीच्या डावाला माझे ‘सुवर्ण’ उत्तर - राहुल आवारे
By साहेबराव नरसाळे | Published: May 7, 2018 01:45 PM2018-05-07T13:45:31+5:302018-05-07T13:46:07+5:30
रविवारी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाताना राहुल आवारे नगरमध्ये थांबला होता. त्यावेळी त्याने ‘लोकमत’शी संवाद साधला.
साहेबराव नरसाळे
अहमदनगर : ‘रिओ आॅलिंपिक’ स्पर्धेत भारतीय कुस्ती महासंघाने केलेल्या अन्यायाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून उत्तर दिले आहे. आता आॅगस्टमध्ये एशियन गेम्स आणि २०२० मध्ये टोकियो आॅलिंपिक होत आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणारच, असा निर्धार आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
रविवारी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाताना राहुल आवारे नगरमध्ये थांबला होता. त्यावेळी त्याने ‘लोकमत’शी संवाद साधला. २०१६ साली झालेल्या रिओ आॅलिंपिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत आवारे याने सर्व प्रतिस्पर्धी मल्लांवर मात करीत रिओ आॅलिंपिक स्पर्धेतील सहभागावर आपला हक्क सांगितला होता. मात्र, भारतीय कुस्ती महासंघाने राहुलला डावलून हरियाणाच्या संदीप तोमरची निवड केली होती. तसेच राहुलवर बंदी घालण्याची धमकीही दिली होती. त्यावरुन महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात मोठे वादळ उठले होते. २०१६ च्या वादानंतर राहुल आवारे प्रथमच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या आखाड्यात उतरला होता. त्यामुळे राहुलच्या कुस्तीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. राष्ट्रकुलमध्ये ५७ किलो वजनगटात राहुलने सुवर्णपदक पटकावले.
आॅलिंपिक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. तेच स्वप्न घेऊन मी खेळत होतो. पण २०१६ साली माझ्यावर अन्याय झाला. त्यानंतर पुन्हा सर्वोत्कृष्ट कामगिरी करणे माझ्यासाठी खूप अवघड होते. त्या अन्यायाला उत्तर देण्यासाठीच मी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने उतरलो होतो. त्यांना त्यांचे उत्तर मिळाले आहे. आता मागील विसरुन पुढील स्पर्धांवर लक्ष केंद्रित केले आहे. आॅगस्ट २०१८ मध्ये एशियन गेम्स स्पर्धा होत आहेत. त्याची तयारी सुरु आहे. पुढील महिन्यात जॉर्जिया येथे प्रशिक्षणासाठी जात आहे. त्यानंतर सोनीपत येथे कुस्ती प्रशिक्षण शिबिर आहे. २०२० मध्ये टोकियो येथे आॅलिंपिक स्पर्धा होत आहे. त्याचीही तयारी सुरु आहे, असे राहुल आवारे याने सांगितले.
टोकियो आॅलिंपिकची तयारी
टोकियो आॅलिंपिकसाठी पुढील वर्षी पात्रता स्पर्धा होणार आहे. त्यासाठीही परदेशात जाऊन प्रशिक्षण घेणार आहे. परदेशात जाऊन कुस्तीचा सराव यासाठी करायचा आहे की, तेथे विविध देशातील आंतरराष्ट्रीय मल्ल येतात. त्यांच्याकडून आपल्याला कुस्तीतील नवेनवे डाव-प्रतिडाव शिकायला मिळतात. तसेच तेथे सुविधाही चांगल्या असतात, असे राहुल आवारे याने सांगितले.