ऊठ-सूठ झोपेतही ‘त्यांना’ माझे सोयरे दिसतात!
By Admin | Published: May 31, 2014 11:32 PM2014-05-31T23:32:24+5:302014-06-01T00:21:53+5:30
अहमदनगर : शिवसेनेत लोकशाही आहे, सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे.
अहमदनगर : शिवसेनेत लोकशाही आहे, सर्वांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. मला ही तो आहे. यामुळे मी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून नाही तर नगर शहर मतदारसंघातूनच सेनेकडून लढणार आहे. ऊठ-सूठ झोपेतही ‘त्यांना’ माझे सोयरे दिसतात, पण सोयर्यांविरुद्ध सेनेकडून मी केलेला संघर्ष दिसला नाही का?’’ असा टोला सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी आ. अनिल राठोड यांना मारला. दक्षिण शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख सुहास सामंत, खा. दिलीप गांधी, खा. सदाशिव लोखंडे, उपजिल्हा प्रमुख अनिल कराळे, राजेंद्र दळवी, प्रा.मधुकर राळेभात, महिला संघटक प्रमुख सुजाता कदम आदी यावेळी उपस्थित होते. आढावा बैठकीत सर्व तालुका प्रमुखांनी लोकसभा निवडणूक व मतदानाचा आढावा जाहीर करून सेनेकडून प्रा.गाडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. यावेळी प्रा. गाडे म्हणाले की, जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवल्याने दोन्ही जागा युतीच्या निवडून आल्या. आता विधानसभा निवडणुकीतही असेच एकदिलाने काम केले तर जिल्ह्यातील १२ च्या १२ आमदार युतीचे निवडून येतील. शिवसैनिकांच्या आग्रहाखातर यावेळी मी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीगोंदा मतदारसंघ भाजपाकडे असल्याने मी नगर शहरातून शिवसेनेची उमेदवारी करणार आहे. पक्षश्रेष्ठींकडे मी उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. जनता विकास कामांना पाठबळ देणारी असल्याने आता भावनिक मुद्यांची दुकानदारी मतदारांमध्ये चालणार नाही. प्रा. गाडे पुढे म्हणाले की, आ.अनिल राठोड यांच्या व्हॉटस्अॅपवरून बदनामी प्रकरणी नेमका माझ्याच मुलावर गुन्हा दाखल कसा झाला. तो परदेशात होता. तो नगरमध्ये येण्याआधीच बदनामीचा मॅसेज शहरात आठवडाभर फिरत होता. कुरघोडी म्हणूनच हा गुन्हा दाखल केला. मात्र व्हॉटस्अॅपवर जो मजकूर होता त्याची चर्चा तर महिनाभर आधी लोक करत होते ते फक्त व्हॉटस्अॅपवर आले. ज्यांनी हा मेसेज तयार केला सर्वात आधी पाठवला त्याचा शोध घ्या. आ.शिवाजी कर्डिले, आ.अरुण जगताप, भानुदास कोतकर हे माझे सोयरे आहेत. पण राजकारण आणि नाते संबंध याचे तारतम्य मी पाळतो. राजकारणात त्याचा संबंध येऊ देत नाही. कोतकरांच्या विरोधात लढलो, कर्डिलेंच्या विरोधात लढलो, जगतापांना महापौरपदाच्या निवडणुकीत शह देऊन शीला शिंदे यांना महापौर करण्यात पुढाकार घेतला. सेनेने माझ्यावर जबाबदारी दिली ती पूर्ण करताना सोयर्याधायर्यांचा विचार केला नाही, करणार नाही. तरीपण आ.राठोड यांना झोपेतही माझे सोयरेच कसे दिसतात? असा टोला प्रा.गाडे यांनी मारला. खा.दिलीप गांधी व खा. सदाशिव लोखंडे यांचा शिवसेनेतर्फे सत्कार ठेवला म्हणून आ. राठोड यांना वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. ते युतीचे खासदार आहेत.(प्रतिनिधी)शिवसेनेने गेल्या तीन-चार वर्षात कुणामुळे काय घडलयं काय बिघडलय, कुणी ते बिघडवलंय याचा अहवाल तयार केला आहे. तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सादर केला आहे. नगर शहरातून गाडे की राठोड याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील. जो कोणी उमेदवार असेल त्यांना निवडून आणू. -सुहास सामंत जिल्हा संपर्क प्रमुखसेनेच्या बैठकीत राठोडांवर आगपाखड जिल्हा शिवसेनेच्या बैठकीत जिल्हा प्रमुख प्रा.गाडे यांनी आ.राठोड यांच्यावर कधी नाव घेऊन तर कधी नाव न घेता जोरदार व आक्रमकपणे टिकेचा प्रहार केला. परस्पर माझ्याबद्दल प्रतिक्रिया देण्यापेक्षा पक्षाच्या व्यासपीठावर येऊन बोला मग मी सगळं सांगतो, असा सल्लाही त्यांनी दिला.