नद्याजोड प्रकल्प देशासाठी धोकादायक - जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 06:56 PM2018-02-08T18:56:03+5:302018-02-08T18:58:53+5:30
महाराष्ट्राचे जलयुक्त शिवारचे काम सर्वोत्तम असून हीच योजना देशात लागू करण्याची गरज आहे. नद्याजोड प्रकल्पामुळे राज्याराज्यात भांडणे लागतील, त्यामुळे हा प्रकल्प देशासाठी धोकादायक आहे, अशी भीती जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली.
अहमदनगर : महाराष्ट्राचे जलयुक्त शिवारचे काम सर्वोत्तम असून हीच योजना देशात लागू करण्याची गरज आहे. नद्याजोड प्रकल्पामुळे राज्याराज्यात भांडणे लागतील, त्यामुळे हा प्रकल्प देशासाठी धोकादायक आहे, अशी भीती जलबिरादरी प्रकल्पाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.
पाणी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांच्या उपस्थितीत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंधारणाबाबत बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्याबरोबरच नगर जिल्ह्याचे जलसंधारणातील काम समाधानकारक आहे. त्यात आणखी सुधारणा करता येईल. परंतु जलयुक्त शिवार योजना महत्वपूर्ण असून ती देशात राबवली तर मोठा बदल होऊ शकतो. या योजनेतून जलसंधारण कामांत शासनाला लोकसहभागाची जोड मिळते. कोणत्याही शासकीय कामाला लोकसहभाग मिळाला तर त्याचा निकाल वेगळा असतो. त्यामुळे देशातील अवर्षणप्रवण भागात ही योजना संजीवनी ठरू शकते. नद्याजोड प्रकल्पांना गती देण्याचे शासकीय धोरण आहे. परंतु ही संकल्पनाच मुळी चुकीची आहे. नद्या जोडण्यापेक्षा या प्रकल्पात जनतेला जोडणे गरजेचे आहे.