नगर-दौंड मार्ग : एक किलोमीटर रस्त्याला ११ कोटी खर्च!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 01:42 PM2018-11-04T13:42:13+5:302018-11-04T13:42:16+5:30
मनमाड ते फलटण या राष्ट्रीय महामार्गावरील नगर ते वासुंदे फाटा या ९३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर सुमारे १ हजार ५० कोटी खर्च होणार आहेत.
श्रीगोंदा : मनमाड ते फलटण या राष्ट्रीय महामार्गावरील नगर ते वासुंदे फाटा या ९३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर सुमारे १ हजार ५० कोटी खर्च होणार आहेत. त्यामुळे एक किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर सुमारे ११ कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. कोट्यवधी रूपयांचा खर्च होऊनही काही ठिकाणी रस्त्याला आताच तडे गेले आहेत.
या महामार्गाचे काम गुजरात राज्यातील अग्रवाल कंपनीमार्फत होत आहे.
अग्रवाल कंपनीस ६४७ कोटी रूपयांना हे काम दिले असले तरी वनविभाग व खासगी जमीन आरक्षित करणे, पर्यावरण कामांसाठी सरकारने सुमारे ४०० कोटींची तरतूद केली आहे. सुरूवातीला कंपनीने कामाचा दर्जा चांगला राखला होता. पण गेल्या महिन्यापासून काम लवकर करण्याच्या नावाखाली काँक्रिटीकरणाचे काम खराब झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले आहेत. लोणी व्यंकनाथ जवळ काम सुरू असताना साईडपट्ट्या काँक्रिट कामाच्या खाली उतरल्या आहेत. त्यामुळे या साईडपट्ट्या पुन्हा भरण्याची गरज आहे.
रस्त्याच्या कामासाठी कोळगाव परिसरात विनापरवाना टेकड्या फोडून उत्खनन करण्यात आले आहे. वृक्षतोडीचे नियम धाब्यावर बसवून वृक्षतोड करण्यात आली आहे. नवीन झाडे लावण्याचे नियोजनही अजून दिसत नाही. नगर-दौड रस्त्याचे काँक्रिटकरण झाल्यानंतर पुरेसे पाणी २१ दिवस मारले जात नाही. त्यामुळे कामास तडे जात आहेत. याकडे कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे. - भगवान गोरखे, ग्रामस्थ, लोणी व्यंकनाथ.