नगर जिल्ह्यात जनावरांनी खाल्ला ३१७ कोटीचा चारा, गैरव्यवहार झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 06:45 AM2020-01-22T06:45:33+5:302020-01-22T06:46:24+5:30

चारा-छावण्या, टँकर व जलयुक्त शिवारच्या कामांत गैरव्यवहार झाल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केल्यापासून हे तिन्ही विभाग चांगलेच चर्चेत आले आहेत.

In the Nagar district, the animals have eaten Rs. 317 crore fodder, suspected of misconduct | नगर जिल्ह्यात जनावरांनी खाल्ला ३१७ कोटीचा चारा, गैरव्यवहार झाल्याचा संशय

नगर जिल्ह्यात जनावरांनी खाल्ला ३१७ कोटीचा चारा, गैरव्यवहार झाल्याचा संशय

- चंद्रकांत शेळके
अहमदनगर : चारा-छावण्या, टँकर व जलयुक्त शिवारच्या कामांत गैरव्यवहार झाल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केल्यापासून हे तिन्ही विभाग चांगलेच चर्चेत आले आहेत. जिल्ह्यातील चारा छावण्यांसाठी शासनाने ३१७ कोटी रूपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले असून त्यातील २७६ कोटी रूपये छावणीचालकांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत.

पावसाअभावी मागील वर्षी जिल्ह्यात पाणी व चाराटंचाई निर्माण झाल्याने शासनाने फेब्रुवारी २०१९पासून जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागवले. सुरूवातीलाच या छावणीचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तत्कालीन सत्ताधारी आमदारांची शिफारस व पालकमंत्र्यांची संमती या छावण्यांसाठी लागत असल्याने एकाच पक्षाच्या कार्यकर्त्यांना या छावण्या दिल्या गेल्या असा आरोप प्रारंभी अनेकांनी केला. छावण्या सुरू झाल्यानंतर जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. मे, जून या महिन्यांत छावण्यांचा आकडा पाचशेच्या पार झाला. ९ तालुक्यांतील ५0४ छावण्यांत ३ लाख ३६ हजार जनावरे दाखल होती.

जूनअखेर पावसाने हजेरी लावल्यानंतर काही भागांतील छावण्या हळूहळू कमी होऊ लागल्या. तरीही २३ आॅक्टोबरपर्यंत छावण्या सुरू होत्या. या नऊ महिन्यांत छावण्यांसाठी ३१७ कोटी रूपये शासनाने जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले. छावणी चालकांनी बिले सादर केल्यानंतर त्यातील २७६ कोटी रूपये छावणी चालकांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. उर्वरित निधी अद्याप वाटप झालेला नाही. तपासणीत जिल्हा प्रशासनाने काही छावणी चालकांवर दंडात्मक कारवाईही केली.

छावण्या मंजूर करतानाच्या अटी-शर्ती, मंजूर छावण्यांतील जनावरे, तसेच त्यांना दिला गेलेला चारा अशा अनेक विषयांवर आमदार रोहित पवार यांनी छावण्यांच्या चौकशीची मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्याची तत्काळ दखल घेत चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: In the Nagar district, the animals have eaten Rs. 317 crore fodder, suspected of misconduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.