आयुष्मान कार्ड काढण्यात नगर जिल्हा राज्यात प्रथम; राज्यात ९२ लाखांचा टप्पा पार

By चंद्रकांत शेळके | Published: December 21, 2023 09:33 PM2023-12-21T21:33:09+5:302023-12-21T21:33:42+5:30

राज्यात गेल्या तीन महिन्यांत एकूण ९२ लाख ६९ हजार कार्ड काढण्यात आले आहेत.

Nagar district first in state in drawing Ayushman card; Crossed the mark of 92 lakhs in the state | आयुष्मान कार्ड काढण्यात नगर जिल्हा राज्यात प्रथम; राज्यात ९२ लाखांचा टप्पा पार

प्रतिकात्मक फोटो

अहमदनगर : पाच लाखांचा कौटुंबिक आरोग्य विमा असलेली राज्य व केंद्र सरकारच्याआयुष्मान भारत जन आरोग्य योजनेत नगर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात सर्वाधिक ६ लाख ३९ हजार आयुष्मान कार्ड नगर जिल्ह्याने लाभार्थ्यांना दिले आहेत. दरम्यान, राज्यात गेल्या तीन महिन्यांत एकूण ९२ लाख ६९ हजार कार्ड काढण्यात आले आहेत.

प्रारंभी केवळ दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना असलेली आयुष्मान भारत जनआरोग्य योजना आता टप्प्याटप्प्याने सर्वांनाच लागू होत आहे. केंद्राच्या आयुष्मान भारत योजनेद्वारे पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. दुसरीकडे राज्यात महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येतच होती. आता या दोन्ही योजना एकत्र करण्यात आल्या असून, दोन्ही योजनांचे मिळून एकच आयुष्मान कार्ड देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच शिधापत्रिकाधारक आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवास प्रमाणपत्र असणाऱ्यास या योजनेचा फायदा होणार आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे १३ लाख ८२ हजार ६६२, तर महात्मा फुले योजनेचे १७ लाख ८२ हजार ४५३ लाभार्थी आहेत. असे एकूण ३१ लाख ६५ हजार १२४ लाभार्थ्यांना आता आयुष्मान कार्डचे वाटप आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. त्यांपैकी गेल्या तीन महिन्यांत ६ लाख ३९ हजार कार्ड काढले असून एकूण कार्डचा आकडा ११ लाखांच्या पुढे गेला आहे.

दरम्यान, हे कार्ड काढण्यात नगर जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत म्हणजे १३ सप्टेेंबरपासून १७ डिसेंबरपर्यंत राज्यात एकूण ९२ लाख ६९ हजार ७१४ आयुष्मान कार्ड काढण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक ६ लाख ३९ हजार ३७४ कार्ड काढून नगर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

जिल्ह्यात ४२ खासगी रुग्णालयांत मिळणार उपचार
या योजने अंतर्गत वर्षभरात एका कुटुंबास ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. त्यासाठी जिल्हा रुग्णालय व ४२ खासगी रुग्णालयांची निवड जिल्ह्यात करण्यात आलेली आहे. त्यातील १४ खासगी रुग्णालये नगर शहरातील आहेत. हे कार्ड असेल तर कोणताही रुग्ण या खासगी रुग्णालयांत ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार घेऊ शकतो.

सर्व लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे. मोबाइलमध्येही ते काढता येते. शिवाय सर्व ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र, आशा सेविका किंवा ग्रामपंचायत योजनेतील रुग्णालयांमध्ये आरोग्य मित्रांच्या मदतीने हे कार्ड काढता येते.
- डाॅ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी

गेल्या तीन महिन्यातील कार्डनिर्मिती
अहमदनगर - ६ लाख ३९ हजार
नाशिक - ६ लाख २७ हजार
सांगली - ५ लाख ६१ हजार
पुणे - ४ लाख ६७ हजार
नागपूर - ५ लाख ९० हजार
औरंगाबाद - २ लाख ४८ हजार
कोल्हापूर - ४ लाख ६७ हजार.
 

Web Title: Nagar district first in state in drawing Ayushman card; Crossed the mark of 92 lakhs in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.