नगरने काँग्रेसला दिले तीन प्रदेशाध्यक्ष; मुख्यमंत्रीपदाची अद्याप प्रतिक्षाच
By सुधीर लंके | Published: July 14, 2019 05:11 AM2019-07-14T05:11:35+5:302019-07-14T05:12:23+5:30
बाळासाहेब थोरात यांच्या नियुक्तीमुळे नगर जिल्ह्याला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
- सुधीर लंके
अहमदनगर : बाळासाहेब थोरात यांच्या नियुक्तीमुळे नगर जिल्ह्याला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे. यापूर्वी एस.एम.आय. असीर व गोविंदराव आदिक यांना ही संधी मिळाली होती. नगर जिल्ह्यात थोरात यांच्यासह आठ नेत्यांनी आजवर विविध पक्षांचे प्रदेशाध्यक्षपद भूषविले. यापूर्वी नगरचे एस.एम.आय. असीर हे १९८३ साली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले होते. २००० ते
२००३ या काळात श्रीरामपूरचे गोविंदराव आदिक यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसची धुरा सांभाळली
होती. नगर जिल्ह्याचे सुपूत्र असलेले दिवंगत माजी मंत्री दादासाहेब रुपवते हे समांतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. तर दिवंगत बाळासाहेब विखे यांनी महाराष्टÑ समाजवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली होती. बबनराव ढाकणे हे जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते.
असीर, रुपवते, ढाकणे व विखे हे एकाच कालखंडात विविध पक्षांचे प्रमुख होते. राष्टÑवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर बबनराव पाचपुते व मधुकर पिचड यांना या पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळालेली आहे.
नगर जिल्हा हा मात्तबर नेत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मुख्यमंत्रीपदाची संधी या जिल्ह्याला आजवर मिळाली नाही. थोरात यांचे काँग्रेसमध्ये दिल्लीदरबारी वजन वाढले आहे. राहुल गांधी यांचा त्यांच्यावर विश्वास आहे.
राधाकृष्ण विखे यांची गत पाच वर्षांत भाजपशी जवळीक वाढली होती. त्याचवेळी काँग्रेसने थोरात यांना केंद्रीय समितीवर घेत त्यांच्याकडे पक्षाचे पुढील नेतृत्व जाणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी राज्यातील नेतृत्त्वात बदल करीत थोरात यांना पक्षाध्यक्षपदाची संधी दिली.
>थोरात-विखे संघर्ष कायम?
विखे यांना भाजपने मंत्रिपद दिले.दुसरीकडे काँग्रेसने थोरात यांना प्रदेशाध्यक्षपद दिले. त्यामुळे नगर जिल्हा व राज्यात आगामी काळातही थोरात-विखे हा संघर्ष कायम राहील. थोरात हे संयमी नेते म्हणून ओळखले जातात. समविचारी पक्षांची ते कशी मोट बांधतात, याची प्रतीक्षा राहील. राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व त्यांचे चांगले संबंध आहेत.