नगर-मनमाड महामार्ग अडविला
By Admin | Published: April 28, 2016 11:10 PM2016-04-28T23:10:12+5:302016-04-28T23:13:29+5:30
अस्तगाव / राहाता : निळवंडे कृती समितीच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर पिंप्री निर्मळ (ता़ राहाता) येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़
अस्तगाव / राहाता : निळवंडे धरणाच्या कालव्यांचे रखडलेले काम मार्गी लागावे, या मागणीसाठी निळवंडे कृती समितीच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर पिंप्री निर्मळ (ता़ राहाता) येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ शेकडो महिला-पुरुषांनी रस्त्यावर उतरुन कालव्यांच्या कामांना निधीची मागणी केली तर अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावरच मुंडण करुन सरकारचा निषेध केला़
निळवंडे धरणाच्या पाण्यावर नगरपंचायत, नगरपालिका, जादा लोकसंख्या असलेली गावे, धार्मिक स्थळे यांचे आरक्षण नसावे, निळवंडे धरणाचा जुना ठेकेदार बदलून नवा ठेकेदार नेमण्यात यावा, निळवंडे धरणाच्या कालव्याची कामे एका वर्षात पूर्ण करावीत, शासनाने लवकरात लवकर सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करुन केंद्र सरकारची मदत मिळवण्यासाठी स्टेट फायनान्स क्लियरंस केंद्र सरकारकडे पाठवावे, या पाण्यावर कोणतेही आरक्षण टाकू नये, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या़ शेकडो महिलांनी पाण्याचे रिकामे हंडे घेऊन महामार्ग अडविला़ गुरुवारी नऊ वाजता सुरु केलेला हा रास्ता रोको सुमारे दोन तास चालला़ सरकारच्या निष्क्रीयतेच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत महामार्गावरच अनेक शेतकऱ्यांनी सामूहिक मुंडण केले़ त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला. नगर-मनमाड महामार्गावर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़
राहात्याचे तहसीलदार सुभाष दळवी, जलसंपदा विभागाचे अभियंता मोरे यांनी आंदोलकांचे म्हणणे समजून घेत निवेदन स्वीकारले़ आंदोलनात खासदार सदाशिव लोखंडे, समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, नानासाहेब शेळके, कार्याध्यक्ष गंगाधर गमे, संस्थापक नानासाहेब शेळके, सचिव उत्तमराव घोरपडे, उपाध्यक्ष रमेश शिंदे, उज्वलाताई शेळके, डॉ़ एकनाथ गोंदकर, प्राजक्त तनपुरे, दत्ता भालेराव, भाऊसाहेब शिंदे, जयंत गायकवाड, भाऊसाहेब थोरात, सोमनाथ दरंदले आदी उपस्थित होते़
(वार्ताहर)
लाभक्षेत्रातील शेतीला निळवंडेचे पाणी मिळेपर्यंत निळवंडेच्या पाण्याला हात लावू देणार नाही़
-ज्ञानेश्वर वर्पे,
अध्यक्ष, निळवंडे कृती समिती
प्रवरा परिसरात २२ दिवसाला रोटेशन मिळते तर शेजारील शिर्डी व गणेश परिसरात १२० दिवसाला रोटेशन मिळते. आमच्यावर इतका मोठा अन्याय का? चाळीस वर्षापासून निळवंडेच्या नावावर आमदारकी, खासदारकी व मंत्रिपदे भोगणाऱ्यांनी कोणते प्रश्न सोडवले? -गंगाधर गमे,
कार्याध्यक्ष, निळवंडे कृती समिती