नगर - मनमाड महामार्गाची झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:22 AM2021-09-03T04:22:12+5:302021-09-03T04:22:12+5:30
नगर शहरातून जाणाऱ्या अनेक महामार्गांपैकी नगर-मनमाड महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा आहे. या महामार्गावर राहुरी कृषी विद्यापीठ, ...
नगर शहरातून जाणाऱ्या अनेक महामार्गांपैकी नगर-मनमाड महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा आहे. या महामार्गावर राहुरी कृषी विद्यापीठ, शिंगवे व देहरे येथील मोठ्या शाळा तसेच शहरालगत असलेली एमआयडीसी असल्यामुळे नित्याच्या दैनंदिन कामासाठी जाणाऱ्या-येणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही जास्त असते.
दरम्यान पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले असून विळद ते देहरे पर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्यामुळे खड्डे चुकवताना अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. रस्त्यावर दीड फुटापर्यंत खड्डे पडले असून यापूर्वी खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, अशी मागणी वाहनधारकांमधून जोर धरू लागली आहे. महामार्गावर विळद गाव, विळद पाण्याची टाकी, देहरे दरम्यान मोठे खड्डे असून पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने अनेक वाहन धारकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे वाहनांचे नुकसान होऊन आर्थिक झळ बसत आहे.
................
देहरे स्टॅण्डवर धुळींचे लोट
देहरे स्टॅण्ड परिसरात रस्त्याची चाळण झाली असून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धुळींचे लोट पसरत आहेत. या धुळीचा त्रास परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात होत असून. या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसन संबंधित आजारांना सामोरे जावे लागत आहे.
.............
विळद ते देहरे या दरम्यान रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना अनेकांना याचा त्रास होत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी संबंधित विभागाला लवकरच निवेदन देणार आहे.
-व्ही. डी. काळे, पंचायत समिती सदस्य