नगर मनपा निवडणूक २०१८ : बोराटेंचा अर्ज बाद झाल्याने ‘रासप’ची आशा पल्लवीत, भाजप करणार पुरस्कृत ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:47 PM2018-11-23T12:47:04+5:302018-11-23T12:47:53+5:30
अहमदनगर : महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक- १२ ‘अ’ मधून शिवसेना व भाजपच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी ...
अहमदनगर : महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक- १२ ‘अ’ मधून शिवसेना व भाजपच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व रासपच्या उमेदवारात सरळसरळ लढत होणार आहे. निवडणुकीतील स्पर्धा कमी झाल्याने या प्रभागात रासपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
प्रभाग १२- अ मधून शिवसेनेकडून निवडणूक लढवित असलेले विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांच्या अर्जावर घुले यांनी आक्षेप घेतला. मालमत्ता कराची थकबाकी व मोबाईल टॉवरच्या कराची थकबाकीच्या मुद्यावर त्यांचा अर्ज बाद झाला. याच प्रभागातील भाजपाचे उमदेवार सुरेश खरपुडे यांच्यावरील मालमत्ता कराची थकबाकी व मंगल कार्यालयाचे अनाधिकृत बांधकाम केल्याचा आक्षेप घेण्यात आल्याने त्यांचाही अर्ज बाद झाला. या प्रभागात रिंगणात आता रासपचे हरिभाऊ डोळसे आणि राष्ट्रवादीचे संजय घुले यांच्यात लढत आहे. प्रथमच महापालिका निवडणुकीत सक्रिय झालेल्या रासपला या प्रभागाच्या माध्यमातून खाते खोलण्याची संधी आहे़ महापालिका निवडणुकीत रासपचे एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाने संपर्क केला तर रासपचा उमेदवार भाजपा पुरस्कृत असा पर्याय समोर असल्याचे रासपचे जिल्हाध्यक्ष रविंद्र कोठारी यांनी सांगितल़े़.
सेना देणारा रासपला साथ
प्रभाग बारा -अ मधून उमेदवार बाद झाल्याने शिवसेना राष्ट्रीय समाज पक्षाला साथ देण्याच्या तयारीत आहे. सेनेच्या एका नेत्याने यासंदर्भात आमच्याशी संपर्क केला असल्याचे रासपच्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रभागात राजकीय पक्ष काय रणनिती ठरवणार हे शुक्रवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे.