नगर मनपा निवडणूक २०१८ : भाजप उमेदवारांच्या याचिकेवर उद्या सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 02:16 PM2018-11-25T14:16:57+5:302018-11-25T14:17:03+5:30
महापालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज छाननीत बाद झाल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा व सुनेसह चौघांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.
अहमदनगर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज छाननीत बाद झाल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा व सुनेसह चौघांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने चौघांची याचिका दाखल करून घेतली असून त्यावर सोमवारी (दि. २६) सुनावणी होणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या चार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले होते. त्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पहाटे दिला होता. खा. दिलीप गांधी यांच्या बंगल्याचे अतिक्रमण आडवे आल्याने त्यांचा अर्ज बाद ठरला. त्यामुळे गांधीसह चौघा भाजप उमेदवारांनी त्यांच्या वकिलांमार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. यावेळी अॅड. नितीन गवारे यांनी चौघांची बाजू मांडली. निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवण्याबाबत गवारे यांनी आक्षेप घेतला. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे वकीलांनाही त्यांची बाजू मांडण्याचे खंडपीठाने निर्देश दिले. दरम्यान शिवसेनेचे उमेदवार गिरीश जाधव यांनी आधीच खंडपीठात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे त्यांचीही बाजू ऐकून घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच याचिकेवर निर्णय होणार आहे. दरम्यान संबंधित हरकतदारांनाही खंडपीठाने सुनावणीच्यावेळी हजर राहण्याचा आदेश बजावला आहे. अर्ज बाद करण्याबाबतचे सर्व रेकॉर्ड सादर करण्याचा आदेशही आयोगाच्या वकिलांना यावेळी देण्यात आला.
याचिकाकर्त्यांची याचिका सकाळी १०.३० वाजता दाखल करून घेतली. त्यावर वकिलांनी २.५० वाजता बाजू मांडली. या याचिकेवरील सुनावणी सोमवारी होणार आहे.
..तर सदस्य झाल्यानंतर अपात्रअनाधिकृत बांधकाम करणारा किंवा त्या जागेत राहणारा, त्या मालमत्तेचा वारसदार पालिकेचा सदस्य म्हणून अनर्ह ठरतो, असे कायद्यात सांगितले आहे. मात्र संबंधित उमेदवार अद्याप सदस्य झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या अधिकारावर बाधा येते, असा युक्तिवाद होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
चिपाडे यांचीही याचिका
प्रभाग ८ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. योगेश चिपाडे यांच्या मालमत्तेवरील थकबाकीमुळे त्यांचा अर्ज बाद झाला होता. विशाल खोटे या प्रभाग ८ मधील एकमेव उमेद्वाराने चिपाडे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यांनीही शनिवारी खंडपीठात अॅड. होन यांच्यामार्फत याचिका दाखल केली. त्यावरही सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या निकालाकडेही शहराचे लक्ष लागले आहे.