नगर मनपा निवडणूक २०१८ : युतीची आशा आता मावळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:51 AM2018-11-11T11:51:39+5:302018-11-11T11:53:07+5:30
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने ३२ उमेदवारांची यादी जाहीर करुन स्वबळाचा नारा दिला आहे.
अहमदनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने ३२ उमेदवारांची यादी जाहीर करुन स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेने गुरुवारी १९ तर शनिवारी १३ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब केले़ तर भाजपने स्वतंत्रपणे उतरण्याची तयारी केली आहे़ त्यामुळे महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत़
शिवसेना उपनेते अनिल राठोड, नगर दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली़ यात बहुतांश जुनेच चेहरे आहेत़ प्रभाग १ मधून दीपाली नितीन बारस्कर, डॉ. चंद्रकांत बारस्कर, प्रभाग २ मधून प्रियंका रघुनाथ तवले, प्रभाग ४ मधून योगिराज शशिकांत गाडे, प्रभाग क्रमांक ५ मधून कलावती शेळके, प्रभाग ६ मधून रवींद्र विलास वाकळे, प्रभाग ७ मधून अशोक बडे, कमल सप्रे, रिता शैलेश भाकरे, अक्षय कातोरे, प्रभाग ८ मधून रोहिणी शेडगे, पुष्पा अनिल बोरुडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, प्रभाग १२ मधून सुरेखा कदम, मंगल लोखंडे, प्रभाग क्रमांक १३ मधून उमेश कवडे, सुभाष लोंढे, संगीता बोज्जा, सुवर्णा गेन्नापा, प्रभाग १४ मधून भगवान फुलसौंदर, सुरेखा भोसले, रेखा भंडारी, प्रभाग १५ मधून सुवर्णा जाधव, विद्याताई खैरे, परसराम गायकवाड, प्रभाग १६ व १७ मधून दिलीप सातपुते व प्रभाग १७ मधून मोहिनी लोंढे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
सहा आयातांना संधी
राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या चंद्रशेखर बोराटे, कलावती शेळके, काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले सुभाष लोंढे, मोहिनी संजय लोंढे, भाजपमधून शिवेसेनेत आलेले दत्तात्रय कावरे तर मनसेतून शिवसेनेत आलेल्या सुवर्णा जाधव यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.
बहीण सेनेत तर भाऊ भाजपात
प्रियंका कराळे या भाजप नगरसेवक महेश तवले यांची बहीण तर अनिकेत कराळे यांची पत्नी आहे. प्रियंका यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे तर महेश तवले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे प्रियंका व महेश हे दोेघे एकाच प्रभागात मात्र वेगवेगळ्या पक्षातून निवडणुकीच्या आखाड्यात असतील़
शिवसेना सर्व जागा लढवणार : राठोड
निवडणुकीला कमी दिवस राहिले आहेत. त्यामुळे तिसरी यादीही लवकरच जाहीर करणार आहोत. सर्व जागी शिवसेना उमेदवार देणार आहे. युतीसाठी वरच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. पक्षप्रमुख जे आदेश देतील तसे आम्ही काम करणार आहोत. युती झाली तर जाहीर यादीत अजिबात बदल होणार नाही, असे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मतदार यादीमध्ये घोळ - काळे
दुसऱ्या प्रभागात साडेपाचशे नावे घुसवल्याची माजी उपमहापौर गीतांजली काळे यांनी जिल्हाधिकाºयाकडे तक्रार केली आहे. प्रभाग क्रमांक १५ मधील प्रथम जाहीर केलेल्या यादीत ही नावे नव्हती़ मात्र अंतिम यादीत अचानक ही नावे आली. बीएलओंनी ही नावे घुसवल्याची तक्रार काळे यांनी केली आहे. वेळ पडली तर न्यायालयात जाण्याची भूमिका काळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
सोमवारी भाजप-राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या मुलाखती
महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात स्वतंत्रपणे उतरण्यासाठी भाजपनेही तयारी केली असून, सोमवारी (दि़ १२) भाजप पहिल्या सत्रात १ ते ५ प्रभागातील, दुसºया सत्रात ६ ते १० प्रभागातील आणि तिसºया सत्रात ११ ते १७ क्रमांकाच्या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे़ सुमारे १६८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले आहेत, अशी माहिती भाजपा शहर जिल्हाध्यक्ष, खासदार दिलीप गांधी यांनी दिली.
आघाडीबाबत अद्याप बोलणी सुरुच
काँगे्रस-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत अद्याप बोलणी सुरुच आहे़ राष्ट्रवादीकडून १०७ इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत़ सर्व इच्छुकांच्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून मुलाखती होणार आहेत़ सर्व जागांसाठी मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष प्रा़ माणिक विधाते यांनी दिली़