नगर मनपा निवडणूक २०१८ : केडगावमध्ये आघाडीचा टांगा पलटी, घोडे फरार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:41 AM2018-11-21T10:41:16+5:302018-11-21T10:44:56+5:30
रात्रीतून घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी केडगावमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा राजकीय भूकंप घडला
केडगाव : रात्रीतून घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी केडगावमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा राजकीय भूकंप घडला. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील सर्व कोतकरांच्या सरदारांना भाजपने पहाटेच हायजॅक केले. केडगावमधील पाच कोतकर समर्थकांना ऐनवेळी भाजपची उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादी तर केडगावमधून हद्दपार झाली. यामुळे गेल्या ३० वर्षात प्रथमच केडगावमध्ये काँग्रेसची केविलवाणी अवस्था झाली.
केडगावमधील प्रभाग क्रमांक १६ व १७ मधील काँग्रेस-राष्ट्रवादीने ६ -२ चा फार्म्युला तयार करून राष्ट्रवादीला २ जागा दिल्या. त्यात मनोज कोतकर यांचे नावही प्रभाग १७ मधून राष्ट्रवादीने अधिकृतरीत्या जाहीर केले. मंगळवारी काँग्रेसचे उमेदवार जाहीर होणार होते. सर्वांनाच त्याची उत्सुकता होती. मात्र केडगावमधील सर्व कोतकर समर्थक व आ. संग्राम जगताप समर्थक इच्छुक उमेदवारांना सोमवारी रात्री तुम्हाला भाजपकडून अर्ज भरावा लागणार असे आदेश नेत्यांकडून मिळाले. हे नेते मात्र कोण हे गुलदस्त्यात आहेत. या आदेशाने कोतकर समर्थक व जगताप समर्थक हादरून गेले. प्रचार तर पंजा व घड्याळ यांचा सुरु असल्याने ऐनवेळी कमळ घेऊन कसे उभे राहायचे असा प्रश्न त्यांना पडला. या प्रश्नाने झोप उडालेले कोतकर समर्थक रात्रभर जागेच राहिले. पहाटेच त्यांना आमदार शिवाजी कर्डिले यांच्या बाजार समितीमधील कार्यालयात बोलावून घेण्यात आले. तेथे सर्व इच्छुकांचे भाजपकडून उमेदवारी अर्ज भरून घेण्यात आले.
यानंतर सर्व इच्छुक केडगाव मनपा कार्यालयात दाखल झाले. त्यांच्यानंतर आ. कर्डिले यांचे प्रतिनिधी भाजपचे पाच एबी फॉर्म घेऊन कार्यालयात आले. प्रभाग १६ मधून काँग्रेसचे नगरसेवक सुनील सर्जेराव कोतकर व सुनीता कांबळे यांच्यासह गणेश सातपुते या काँग्रेस इच्छुकांचे आणि प्रभाग १७ मधून मनोज कोतकर आणि लताबाई बलभीम शेळके या राष्ट्रवादीच्या इच्छुकांचे भाजपचे ए बी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले. उर्वरित प्रभाग १६ मधून अभय आगरकर गटाचे ज्योती राजेंद्र सातपुते यांना व खा. दिलीप गांधी गटाला प्रभाग १७ मधून गौरी गणेश ननावरे आणि राहुल कांबळे यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. काँग्रेस आघाडीचे उमेदवार भाजपकडून मैदानात उतरल्याने काँग्रेस हतबल झाली.
ऐनवेळी मिळालेले उमेदवारांना एबी फॉर्म देऊन काँग्रेसने अब्रू वाचवली. एकही जागा न मिळाल्याने राष्ट्रवादी केडगावमधून हद्दपार झाली आहे.
केडगावमध्ये अशा होतील लढती
प्रभाग १६ -(अ )-सुमन कांबळे (काँग्रेस),शांताबाई शिंदे ( शिवसेना), सुनीता कांबळे ( भाजप). १६ (ब)-शोभा रामदास कोतकर (काँग्रेस), सुनीता संजय कोतकर (सेना),ज्योती सातपुते (भाजप), १६ (क)-गणेश भोसले ( काँग्रेस), विजय पठारे ( सेना), गणेश सातपुते (भाजप), १६ (ड)-पोपट कराळे (काँग्रेस), अमोल उर्फ ज्ञानेश्वर येवले (सेना), सुनीलकुमार कोतकर(भाजप), प्रभाग १७ (अ)-सागर भिंगारदिवे (काँग्रेस),सुभाष कांबळे ( सेना ), राहुल कांबळे (भाजप), १७ (ब)-कांचन शिंदे (काँग्रेस). मोहिनी लोंढे (सेना), गौरी ननावरे (भाजप), १७ (क)-रेणुका सुबे (काँग्रेस),मनीषा कारखेले (सेना), लताबाई शेळके पंजाचा प्रचार करणाºयांच्या हाती कमळ (भाजप),१७ (ड)-राहुल चिपाडे (काँग्रेस), दिलीप सातपुते ( सेना), मनोज कोतकर (भाजप)
पंजाचा प्रचार करणा-यांच्या हाती कमळ
काँग्रेसचे दोन विद्यमान नगरसेवक सुनील कोतकर व सुनीता कांबळे हे यावेळी भाजपकडून मैदानात उतरले आहेत. तर सेनेचे उपप्रमुख वसंत शिंदे यांच्या पत्नी कांचन काँग्रेसकडून मैदानात उतरल्या आहेत. पंजा आणि घड्याळ चिन्ह घेऊन घरोघरी फिरणारे आघाडीचे उमेदवार आता कमळ घेऊन मतदारांच्या भेटीला जाणार आहेत. अनेक उमेदवारांची मानसिकता शेवटच्या क्षणी तयार करण्यात आली. नेत्यांचा आदेश मानून सर्वांनी कमळ गळ्यात घातले.
तासाभरात बदलल्या पोस्ट
काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेद्वार पंजा व घड्याळ चिन्ह टाकून सोशल मीडियावर व्हायरल करत होते. सकाळपर्यंत या पोस्ट सुरु होत्या. मात्र दुपारनंतर अचानक या सर्वांनी भाजपचे कमळ असणाºया पोस्ट टाकल्याने सर्वच जण अचंबित झाले. तोपर्यंत सर्वसामान्य नागरिक केडगावच्या घडामोडीपासून अनभिज्ञ होते.
बालेकिल्ला ढासळला
कोतकरांनी गेल्या ३० वर्षांपासून केडगाव हा काँग्रेसचा अभेद्य किल्ला मजबूत ठेवला. अनेक निवडणुका आल्या. विविध पक्षांच्या लाटा आल्या पण किल्ला मजबूतच राहिला. मात्र या निवडणुकीत एका रात्रीतून असा कोणता चमत्कार झाला की ज्यामुळे याच किल्ल्याचे सर्व सरदार अचानक भाजपमध्ये दाखल झाले. याचे कोडे मात्र अनुत्तरितच राहिले. विशेष म्हणजे काँग्रेस आघाडीतून भाजपमध्ये आलेल्यांना याची काहीच माहिती नव्हती.