नगर मनपा निवडणूक २०१८ : सेना-भाजपची छुपी युती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:39 AM2018-10-28T11:39:13+5:302018-10-28T11:39:17+5:30
‘तुझे-माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना’ अशीच स्थिती सध्या शिवसेना-भाजपची बघायला मिळते आहे.
सुदाम देशमुख
अहमदनगर : ‘तुझे-माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना’ अशीच स्थिती सध्या शिवसेना-भाजपची बघायला मिळते आहे. दोन्ही पक्ष महापालिका निवडणूक स्वतंत्र लढविण्याची भाषा करीत असले तरी दोन्ही पक्षांना पॅनल तयार करण्यासाठी उमेदवार मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपची ‘छुपी’ किंवा ‘पडद्याआडची युती’ पहायला मिळणार आहे.
महापालिकेत सध्या शिवसेनेचे १८ आणि भाजपचे १२ नगरसेवक आहेत. याशिवाय दोन्ही पक्षांनी एक-दोन नगरसेवक पुरस्कृत केले होते. राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक फुटल्याने अडीच वर्षानंतर शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली. २०१३ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली होती. निवडून येण्याच्या क्षमतेनुसार ए, बी, सी अशी कॅटेगिरी तयार करण्यात आली होती. ज्या भागात उमेदवार मिळू शकत नाही, तो भाग त्या-त्या पक्षाच्या ‘सी’ कॅटेगिरीमध्ये समाविष्ट केला होता. यावेळीच्या निवडणुकीमध्ये युतीच होणार नसल्याने कॅटेगिरीचा प्रश्नच राहणार नाही. महापालिकेत कोणत्याही परिस्थितीत भाजपची सत्ता आणायची, असा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी चंग बांधला आहे. महापालिकेतील सत्तेवरच त्यांच्या खासदारकीच्या उमेदवारीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायचे, असे भाजपने निश्चित केले आहे. खा. दिलीप गांधी यांनी ‘४० प्लस’चा नारा दिला आहे. असे असले तरी ३० पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचे ध्येय भाजपने ठेवले आहे. सध्याच्या स्थितीनुसार अद्याप निम्या प्रभागात भाजप तगड्या उमेदवारांच्या शोधात आहे. किमान २७ ते ३० जागांवर भाजपला उमेदवार मिळत नसल्याची स्थिती आहे. याही परिस्थितीत खा. दिलीप गांधी स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. अभय आगरकर यांनाही युती व्हावे, असेच वाटते आहे. मात्र खा. गांधी हे स्वतंत्र लढण्यावर सध्यातरी ठाम आहेत.
‘काहीही झाले तरी शहरात नंबर वनलाच रहायचे’, असा शिवसेनेने चंग बांधला आहे. पूर्वीपेक्षा दोन-चार जागा जास्तच मिळतील, अशीच सेनेची व्यूहरचना आहे. मात्र ६८ जागांवर लढण्यासाठी शिवसेनेलाही उमेद्वार मिळतील, अशी शक्यता नाही. चार जणांचा पॅनल तयार झाला तरी ते एकोप्याने प्रचार करतील, अशी खात्री कोणी द्यायला तयार नाही. ज्या भागात शिवसेना चार उमेदवार देऊ शकत नाही, अशा प्रभागात काही अपक्षांना पुरस्कृत करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. एखादा उमेद्वार अन्य पक्षाच्या उमेदवारांसोबत छुपा पॅनल तयार करू शकतो, अशीच स्थिती आहे.
नेत्यांची भूमिका गुलदस्त्यात
भाजपचे प्रदेश सरचिटणीस सूरजीतसिंह ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीचे कानमंत्र दिले. यावेळी त्यांनी ‘मतविभाजनाची आमची भूमिका नाही’, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. शिवसेनेकडून अद्याप प्रस्ताव आला नाही, असे सांगत सेनेच्या प्रस्तावाची भाजपला अपेक्षा असल्याचेच त्यातून ध्वनीत झाले. दुसरीकडे खऱ्या भाजपशी आमची युती आहे. काही भागात भाजपशी आमची युती राहील, असे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सांगितले. यावरून वरिष्ठ पातळीवर काहीही निर्णय झाला तरी नगर महापालिकेत शिवसेना-भाजपची छुपी युती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केडगावमधून धडा
केडगावच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र उमेदवार दिले होते. तिथेही भाजपने भरपूर प्रचार केला, मात्र तिथे भाजप उमेदवार डिपॉझिटही वाचवू शकला नव्हता. भाजपच्या उमेदवारामुळे सेनेच्या मतांचे विभाजन झाल्याची तिथे चर्चा होती. शिवसेना-भाजपने स्वतंत्र उमेदवार दिले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली तर दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता दोन्ही पक्षातील ज्येष्ठांनी व्यक्त केली आहे. युतीची चर्चा करण्यास अनिल राठोड आणि दिलीप गांधी एकत्र येणे कठीण असल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळेच काही भाजपच्या इच्छुकांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, अॅड. अभय आगरकर यांच्याकडे धाव घेतल्याचे दिसते.