नगर मनपा निवडणूक २०१८ : आघाडीचा निर्णय लांबल्याने इच्छुक अस्वस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:55 AM2018-11-17T10:55:57+5:302018-11-17T10:56:11+5:30
महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसकडे इच्छुकांच्या याद्या तयार आहेत.
अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसकडे इच्छुकांच्या याद्या तयार आहेत. मात्र आघाडीचा निर्णय न झाल्याने उमेदवारी दाखल करण्यास विलंब होत असून, दोन्ही काँग्रेसच्या इच्छुकांची अस्वस्थता वाढली आहे. आ. संग्राम जगताप व सुजय विखे यांच्यात शनिवारी चर्चा होण्याची शक्यता आहे.
धुळे महापालिकेत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे़ आघाडीचा निर्णय होऊन जागा वाटपाची प्रक्रिया दोन्ही काँग्रेसने पूर्ण केली आहे. अहमदनगर महापालिकाही एकत्रित लढविण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये झाला आहे. परंतु, आघाडीची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती घेऊन यादीही तयार केली आहे. या यादीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चेची पहिली फेरीही पार पडली. काँग्रेसकडून जागेचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही. काँग्रेसने राष्ट्रवादीशी चर्चा करण्याचे अधिकार डॉ. सुजय विखे यांना दिले आहेत. परंतु, विखे यांच्याकडून राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्याशी प्राथमिक चर्चा झालेली आहे. मात्र आघाडीबाबत अंतिम निर्णय न झाल्याने राष्ट्रवादीचीही अडचण झाली आहे. इच्छुकांच्या मुलाखती होऊन दोन दिवसांचा कालावधी उलटून गेला. पण, इच्छुकांना अद्याप निरोप मिळालेला नाही़ जागा वाटपात काँग्रेसला जागा सुटल्यास अडचण होईल. म्हणून काहींनी अर्ज घेऊन ठेवले़ परंतु, ते भरले नाहीत. काँगे्रसचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.
नगर शहरात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे़ त्यामुळे ६८ पैकी सर्वाधिक जागांवर उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. मात्र काँग्रेसही सहजासहजी हार मानणार नाही़. त्यामुळे ऐनवेळी जागा वाटपावरून दोन्ही काँग्रेसमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. धुळे महापालिकेतही राष्ट्रवादीला जास्तीच्या जागा देण्यात आल्या आहेत. त्याचीच पुनरावृत्ती नगर महापालिकेतही होण्याची शक्यता आहे. त्यावर अद्याप मोहर उमटलेली नसल्याने इच्छुक धास्तावले आहेत.
आॅनलाईनमुळे ऐनवेळी धावपळ
महापालिका निवडणुकीसाठी आॅनलाईन अर्ज दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आॅनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची पध्दत वेळखाऊ आहे. ऐनवेळी हिरवा कंदील मिळाल्यास अर्ज दाखल करणे शक्य होणार नसल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.