नगर मनपा निवडणूक : आजी-माजी आमदार खासदार दारोदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 11:38 AM2018-12-04T11:38:09+5:302018-12-04T11:38:32+5:30
महापालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे़ प्रचारासाठी शेवटचे चार दिवस राहिल्याने खासदारासंह प्रमुख राजकीय पक्षांचे आजी-माजी आमदार दरोदारी फिरत आहेत़
अहमदनगर : महापालिका निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे़ प्रचारासाठी शेवटचे चार दिवस राहिल्याने खासदारासंह प्रमुख राजकीय पक्षांचे आजी-माजी आमदार दरोदारी फिरत आहेत़ तुल्यबळ उमेदवार असलेल्या प्रभागांत ते अधिक वेळ देत आहेत़ तसेच महापौर पदाचे उमेदवार असलेल्यांना घरी बसविण्यासाठी राजकीय पक्षांनी यंत्रणा कामाला लावल्याने प्रचाराचा शेवटचा टप्पा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे़
भाजपाने ठिकठिकाणी सभा घेऊन वातावरण निर्मिती केली़ सेनेने सोमवारपासून सभा घेण्यास सुरुवात केली आहे़ राष्ट्रवादीचा बैठका आणि वैयक्तिक गाठीभेटींवरच अधिक भर आहे़ राष्ट्रवादीची एकही चौकसभा अद्याप झालेली नाही़ शुक्रवारपर्यंत जाहीर प्रचार करता येईल़ त्यानंतर जाहीर प्रचार बंद होईल़ प्रचार शेवटच्या टप्प्यात असल्याने घड्याळाच्या काट्यावर प्रचार यंत्रणा राबत आहेत़ प्रचार फेऱ्या व सभामध्ये वेळ जातो़ त्यामुळे उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी खासदार, आमदार, माजी आमदार, यांचा भर आहे़ भाजपाच्या प्रचार यंत्रणेचे खासदार दिलीप गांधी व आमदार शिवाजीराव कर्डिले, हे दोघे प्रमुख आहेत़ निवडणुका जिंकण्यात आ़ कर्डिले माहिर असल्याने त्यांच्याकडे पक्षाने केडगावसह काही प्रभागांची जबाबदारी सोपविली आहे़ आ़ अरुण जगताप, आ़ संग्राम जगताप आणि माजी आमदार दादा कळमकर यांच्यासह पदाधिकारी प्रचारात उतरलेले आहेत़ माजी आमदार अनिल राठोड ठिकठिकाणी फिरत आहेत़
अनेक प्रभागात राष्ट्रवादी, भाजप आणि सेनेने विचारपूर्वक तुल्यबळ उमेदवार दिले आहेत़ त्यामुळे उमेदवारांचा कस लागणार आहे, अशा ठिकाणी खासदार, आमदारांनी लक्ष केंद्रीत केले आहे़ आगामी लोकसभा, विधानसभा तोंडावर असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे़ दक्षिण लोकसभेचे सर्वाधिक मतदार नगर शहरात आहेत़
यानिवडणुकीनंतर शहरात नंबर एक कोण ? ते स्पष्ट होईल़ इतर महापालिकांमध्ये भाजपाने कमळ फुलविले़ तसे इथेही कमळ फुलविण्यासाठी दस्तुर खुद्द मुख्यमंत्री या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत़