नगर मनपा निवडणूक : कोतकरांचा सहभाग नसलेली पहिलीच निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 02:15 PM2018-11-01T14:15:47+5:302018-11-01T14:16:02+5:30

केडगावबाहेर कोणत्याही पक्षाची हवा असली तरी येथे मात्र कोतकर फॅक्टरच चालतो, हे आत्तापर्यंतच्या तीन महापालिका निवडणुकीत सिध्द झाले.

Nagar municipal elections: The first election that is not part of Kotak | नगर मनपा निवडणूक : कोतकरांचा सहभाग नसलेली पहिलीच निवडणूक

नगर मनपा निवडणूक : कोतकरांचा सहभाग नसलेली पहिलीच निवडणूक

केडगाव : केडगावबाहेर कोणत्याही पक्षाची हवा असली तरी येथे मात्र कोतकर फॅक्टरच चालतो, हे आत्तापर्यंतच्या तीन महापालिका निवडणुकीत सिध्द झाले. विशेष म्हणजे त्यांच्या गैरहजेरीतही त्यांचाच फॅक्टर प्रभावी ठरला. मात्र आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. काँग्रेस अजून मातब्बर उमेदवारांच्या चाचपणीत गुंतला आहे. त्यांच्या विरोधात सेनेचा पॅनल तयार झाला आहे. भाजप अजून सक्षम उमेदवार शोधण्यात व्यस्त आहे.
जुना प्रभाग क्रमांक ३१,३२ व ३३ चा अर्धा-अर्धा भाग जोडला जाऊन नवा प्रभाग क्रमांक १६ तयार झाला आहे. नगर-पुणे मार्गाची उजवी बाजू म्हणजे हा प्रभाग. मात्र जुने केडगाव गावठाण या प्रभागातून वगळल्याने अनेकांची गणिते चुकली आहेत. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप सातपुते यांचा जुना प्रभाग भूषणनगर, सुचेतानगर व आसपासचा भाग यात समाविष्ट झाला आहे. यात शाहूनगर,ओंकारनगर,माधवनगर,सुवर्णानगर,नवीन गावठाण अंबिकानगर या दाट लोकवस्तीचा भाग समाविष्ट झाला आहे. माजी महापौर संदीप कोतकर, माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, सुनील कोतकर, विशाल कोतकर, सविता कराळे हे काँग्रेसचे तर सेनेचे सातपुते यांनी येथून प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे सातपुते सोडले तर कोणीच येथून इच्छुक दिसत नाही. चारही कोतकर कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. सातपुते यांचा कल प्रभाग १७ मधून असल्याने १६ मधून सेनेने आपला संभाव्य पॅनल तयार केला आहे. सेनेकडून ज्ञानेश्वर उर्फ अमोल येवले, विजय पठारे, सुनीता संजय कोतकर, कविता विजय पोटे यांचा पॅनल तयार झाला आहे. सेनेकडून रमेश परतानी, श्रीकांत चेमटे, मुकेश गावडे, हर्षवर्धन कोतकर यांचीही नावे चर्चिली जात आहेत.
कोतकरांच्या विरोधात सेनेला यापूर्वी उमेदवार शोधण्याची वेळ येत होती. यावेळी मात्र प्रथमच सेनेकडे इच्छुकांची लाईन लागली आहे. हेच या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. काँॅग्रेसकडे मातब्बर उमेदवारांची वानवा असून फार थोडे कोतकर समर्थक या निवडणुकीत इच्छुक आहेत. कोतकर यांच्या घरातील उमेदवार असणार का? याचीच सर्व चर्चा करीत आहेत. मात्र सध्यातरी त्यांच्या घरातील कोणीच या निवडणुकीच्या प्रक्रियेत नाहीत हे केडगावच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरणार आहे. क ाँग्रेसकडून गणेश सातपुते,भूषण गुंड,महेश गुंड,जयद्रथ खाकाळ,सुजित काकडे,पोपट कराळे,रामदास येवले,शोभा रामदास कोतकर,वंदना संजय गारुडकर आदी नावे इच्छुक आहेत.

नव्या प्रभाग पुनर्रचनेत केडगाव मधील वसाहतींची मोठी तोडफोड झाल्याने सर्व काही सेनेला अनुकूल राहील असे दिसत नाही. काही भागात कोतकर यांचे प्राबल्य तर काही ठिकाणी सेनेचे पॉकेट अशा संमिश्र राजकीय परिस्थितीत इच्छुक आपले पावले टाकत आहेत. महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्याची घोषणा करणाऱ्या भाजपला केडगावमध्ये अजून सक्षम उमेदवार मिळाले नाहीत. राजेंद्र सातपुते, प्रतिक बारसे यांचीच नावे पुढे येत आहेत. काँग्रेसमधील नाराज गळाला लागतील, या आशेवर भाजपची चाचपणी सुरु आहे.
या प्रभागात कोतकरांचा बोलबाला सर्वश्रुत आहे. शिवसेना मोठ्या ताकदीने मैदानात उतरली आहे. कोतकर यांची गैरहजेरी आणि घरातील उमेदवार नसणे, प्रचार यंत्रणा सांभाळणाºया नेतृत्वाचा अभाव ही सेनेची जमेची बाजू आहे. तर सेनेला मानणाºया वसाहतींची ताटातूट, इच्छुकांची लाईन यामुळे होणारी नाराजी आणि आ.अरुण जगताप यांनी येथे व्यक्तिगत घातलेले लक्ष ही काँग्रेसची जमेची बाजू असणार आहे. त्यात भाजपच्या उमेदवारांची डोकेदुखी कोणाला होणार याच काळजीत इच्छुक आहेत.
प्रभागातील समस्या
या प्रभागात मुलभूत विकास योजनेतून काही कामे झाली.अंतर्गत रस्त्यांची वाईट अवस्था असताना मुख्य शाहूनगर रस्त्याचीही चाळण झाली आहे.पथदिवे बंद अवस्थेत आहेत. भाजीपाला मार्केट, केडगाव बस सेवा बंद, रस्त्यावरील अतिक्रमणे आदी समस्या अजून सुटलेल्या नाहीत.

केडगाव, भूषणनगर, हॉटेल रंगोली, एच.पी. पेट्रोलपंप, रेणुकानगर, सिटीबस स्टॅण्ड, बँक कॉलनी, शाहुनगर, केडगाव गावठाण परिसर, महाराणी ताराबाई कन्या विद्यालय परिसर, पाच गोडावून परिसर.

अ अनुसूचित जाती (महिला)
ब नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण.

Web Title: Nagar municipal elections: The first election that is not part of Kotak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.