नगरला सर्वोत्कृष्ट भूजल पुनरूज्जीवन पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 04:56 PM2019-02-26T16:56:37+5:302019-02-26T16:56:45+5:30
राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये झालेल्या कामांची दखल राष्ट्रीय पातळीवरून घेण्यात आली असून, केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्राची सर्वोष्कृष्ट राज्य म्हणून निवड झाली आहे. यात नगरला सर्वोत्कृष्ट भूजल पुनरूज्जीवन पुरस्कार मिळाला आहे.
अहमदनगर : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये झालेल्या कामांची दखल राष्ट्रीय पातळीवरून घेण्यात आली असून, केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्राची सर्वोष्कृष्ट राज्य म्हणून निवड झाली आहे. यात नगरला सर्वोत्कृष्ट भूजल पुनरूज्जीवन पुरस्कार मिळाला आहे. सोमवारी पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे यांनी तो दिल्लीत स्वीकारला.
केंद्रीय जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय जल पुरस्कार २०१८मध्ये महाराष्ट्र राज्याने जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेल्या कामागिरीची नोंद घेतली आहे. जलयुक्त शिवार अभियानाद्वारे महाराष्ट्रातील सुमारे १६ हजार गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. तसेच या कामांमुळे अनेक गावांतील भूजल पातळीत वाढ होऊन पाण्याची टंचाई दूर झाली आहे. गेल्या वर्षात टँकरच्या संख्येतही घट झाली होती. राज्य शासनाच्या या कामाची दखल केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये घेण्यात आली आहे. या पुरस्कारात सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. यात विविध गटात राज्याला दहा पुरस्कार मिळाले. त्यात भूजल पुनरुज्जीवन विभागात नगरला प्रथम पुरस्कार मिळाला.
पुरस्काराबद्दल जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. गेल्या चार वर्षात या योजनेमध्ये चांगले काम झाले. सचिव एकनाथ डवले म्हणाले की, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, नदी पुनरुज्जीवन या सारख्या योजनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या व शेतीच्या विकासासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत.
लोणारे यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
जलयुक्त शिवार अभियानामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे यांनी राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले़ नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेले नाविण्यापूर्ण उपक्रम राज्यासाठी मार्गदर्शक असल्याचे सांगत लोणारे यांनी तयार केलेल्या जलयुक्त शिवार अभियान या पुस्तिकेचे विमोचनही फडणवीस यांनी मुंबई येथे केले़