शिर्डीमधील अतिक्रमणाचा प्रयत्न नगरपंचायतीने रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 05:50 PM2018-04-17T17:50:57+5:302018-04-17T17:58:05+5:30
सलग दोन दिवस शिर्डी नगरपंचायतीने साई संकुलातील अतिक्रमणे हटविल्यानंतर मंगळवारी काही जणांनी सवयीप्रमाणे पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न नगरपंचायतीच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हाणून पाडला. दरम्यान बुधवारपासून पालखी मार्गावरील अवैध वाहतुकीचे कोंडाळे दूर करण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे़
शिर्डी : सलग दोन दिवस शिर्डी नगरपंचायतीने साई संकुलातील अतिक्रमणे हटविल्यानंतर मंगळवारी काही जणांनी सवयीप्रमाणे पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न नगरपंचायतीच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हाणून पाडला. दरम्यान बुधवारपासून पालखी मार्गावरील अवैध वाहतुकीचे कोंडाळे दूर करण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे़.
कोट्यवधी रूपयांच्या इमारती, घरे तोडून शहरातील पालखी रस्ता यापूर्वी रूंद करण्यात आला. मात्र आज या रस्त्यावर अवैध वाहतूक करणारी वाहने उभी असतात़ त्यामुळे अनेकदा वृद्ध, महिला व लहान मुलांना या रस्त्यावरून चालणेही अवघड होते़ रस्त्याच्या मध्यभागी वाहने उभे करून प्रवासी भरणे, गर्दीच्या काळातही कडेला बिनधास्त पार्किंग करून आरडाओरड करणारे हे व्यवसायिक त्रासदायक असले तरी शिर्डीकरांच्या सवयीचे झाले आहेत. पोलीस या वाहनांवर कारवाई करण्याचे सोडून भाविकांच्या वाहनांना किंवा परिसरातील मोटार सायकलस्वारांना लक्ष्य करून कारवाई करीत असतात. रूग्णालयासमोर काही रूग्ण किंवा त्यांचे नातेवाईक मोटार सायकल लावतात़ या मोटारसायकली तेथून उचलून नेण्याची बहादुरी पोलीस दाखवितात. त्यांच्याकडून दंड आकारतात. पण शहरातील मध्यवर्ती असलेल्या पालखी मार्गावरील अवैध वाहतूक करणाऱ्या करणारी वाहनांना धक्काही लावत नाहीत.