वाढीव वीजबिले कमी करण्यासाठी नगरपंचायतीचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:21 AM2021-05-26T04:21:30+5:302021-05-26T04:21:30+5:30
गेल्या काही वर्षांपासून अर्थिक मंदीत सापडलेली साईनगरी पहिल्या लॉकडाऊनच्या फटक्यातून सावरली नसतानाच दुसरा लॉकडाऊन सुरू झाला आहे. सध्या व्यवसाय ...
गेल्या काही वर्षांपासून अर्थिक मंदीत सापडलेली साईनगरी पहिल्या लॉकडाऊनच्या फटक्यातून सावरली नसतानाच दुसरा लॉकडाऊन सुरू झाला आहे. सध्या व्यवसाय बंद असूनही महिन्याकाठी हजारो रुपयांची बिले येत आहेत. त्यातच मंदिर उघडण्याबाबत अनिश्चितता आहे. यामुळे व्यावसायिकांना वीजबिले भरणे अशक्य झाले आहे. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी ही बाब आमदार राधाकृष्ण विखे व खासदार डॉ. सुजय विखे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
लॉकडाऊन संपेपर्यंत सध्या मंजूर असलेला वीजभार हा तात्पुरत्या स्वरूपात कमी करून मिळावा, असा अर्ज केला तर वीजभार कमी होऊ शकेल, त्यामुळे वीजबिल कमी होईल, असा उपाय महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितला. त्यानुसार नगराध्यक्ष गोंदकर यांनी शिर्डीतील ज्या व्यावसायिकांचा वीजभार २० किलोवॅटपेक्षा जास्त आहे त्यांनी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी नगरपंचायतीच्या विद्युत विभागात छापील अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून हा अर्ज भरून त्यासोबत वीजबिलाची झेराॅक्स दिल्यास नगरपंचायतीच्या वतीने वीजबिले कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे गोंदकर यांनी सांगितले.
पुढील काळात सर्व व्यावसायिकांना आपला वीजभार पूर्ववत करून घ्यावा लागेल. मात्र लॉकडाऊनच्या काळातील वीजभार कमी केल्यास त्या काळातील बिले कमी होऊ शकतील. त्यादृष्टीने व्यावसायिकांनी तातडीने अर्ज दाखल करावेत, असे आवाहन नगराध्यक्ष गोंदकर यांनी केले. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, गटनेते अशोक गोंदकर, मंगेश त्रिभुवन, दीपक वारुळे, दत्तू गोंदकर, बापू ठाकरे, राजू गोंदकर आदी उपस्थित होते.