दर सोमवारी महिलांसाठी नगर-पुणे बससेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 01:06 PM2019-11-27T13:06:08+5:302019-11-27T13:07:34+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तारकपूर आगारातर्फे खास महिलांसाठी दर सोमवारी नगर-पुणे बससेवा सुरू करण्यात आली आहे.
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तारकपूर आगारातर्फे खास महिलांसाठी दर सोमवारी नगर-पुणे बससेवा सुरू करण्यात आली आहे. पहिल्याच बसला महिलांची उत्स्फूर्त गर्दी होती. महिला वाहकाच्या हस्ते नारळ वाढवून या बससेवेचा प्रारंभ करण्यात आला.
नगर शहर व जिल्ह्यातील अनेक महिला, मुली, विद्यार्थिनी नोकरी, शिक्षणासाठी नगरहून पुणे येथे ये-जा करतात. दुसºया व चौथ्या शनिवारी, तसेच रविवारी सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या व बँकांना सुट्या असतात. त्यामुळे पुण्याहून नगरला येण्यासाठी दर शुक्रवारी पुणे बसस्थानकावर गर्दी असते. तसेच सोमवारी पुन्हा पुण्याकडे जाताना नगरमधील बसस्थानकात महिला बससाठी आटापिटा करताना दिसतात. ही संख्या अधिक असल्याने, तसेच महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी विभागीय नियंत्रक विजय गिते यांनी या मार्गावर खास महिलांसाठी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता या बसला महिला वाहक संध्या हळगावकर यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी दादाजी महाजन व तारकपूरचे आगारप्रमुख अविनाश कल्हापुरे आदी उपस्थित होते. पहिल्या दिवशी तब्बल ४३ महिला प्रवाशांनी ही बस गच्च भरली. या बससेवेमुळे महिलांच्या चेह-यावर समाधान दिसत होते.
दर सोमवारी नगरहून, दुस-या व चौथ्या शुक्रवारी पुण्याहून
दर सोमवारी सकाळी ६ वाजता तारकपूर बसस्थानकातून ही खास बस सुटणार आहे. त्यानंतर महिन्याच्या दुस-या व चौथ्या शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पुणे येथून नगरसाठी बस सुटणार आहे. या बससेवेसाठी मोबाईलद्वारे तिकीट बुकिंगही करता येणार आहे.