नगर, शेवगाव,नेवासा, कर्जत उपांत्य फेरीत
By Admin | Published: August 30, 2014 11:08 PM2014-08-30T23:08:36+5:302014-08-30T23:20:34+5:30
शेवगाव : मुलींच्या शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत \नगर, शेवगाव तालुका संघाने, १७ वर्षे वयोगटातून नेवासा, कर्जत व १९ वर्षे वयोगटातून नगर व कर्जत तालुका संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
शेवगाव : मुलींच्या शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात नगर, शेवगाव तालुका संघाने, १७ वर्षे वयोगटातून नेवासा, कर्जत व १९ वर्षे वयोगटातून नगर व कर्जत तालुका संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
शेवगाव स्पोर्टस् क्लब व विखे फाऊंडेशन इंग्लिश मेडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेद महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी शासकीय क्रीडा मार्गदर्शक सुधीर चपळगावकर यांच्या हस्ते व शेवगाव स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष अरुण वावरे, डॉ. किरण वाघ, निलेश झिरपे, विनायक वाघमोडे, प्राचार्य अनिल दारकुंडे, क्रीडा शिक्षक योगेश जाधव आदींच्या उपस्थितीत झाला. या स्पर्धेत १४, १७ व १९ वयोगटातील प्रत्येक तालुक्यातील एक याप्रमाणे एकूण ४५ मुलींचे संघ सहभागी झाले आहेत.
उपांत्य पूर्व फेरीत १९ वर्षे वयोगटातील नगर व कर्जत तालुका संघात रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत नगर संघाने कर्जत संघावर दोन गुणांनी मात केली.
नगर संघाकडून ऋतुजा भोसले, मयुरी गोरे तर कर्जत संघाकडून निकीता भुजबळ, उर्मिला उघडे यांनी बहारदार खेळ केला तर १७ वर्षे वयोगटातील नेवासा विरुद्ध कर्जत तालुका संघातील रोमहर्षक सामन्यात ज्ञानेश्वर नगर येथील जिजामाता संघाच्या किरण गव्हाणे, प्रतीक्षा काळे, गौरी भगत यांनी चमकदार खेळी करून उपस्थित क्रीडा रसिकांची वाहवा मिळविली.
शेवगाव व परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शनिवारी दुपारी ३ नंतर हे सामने थांबविण्यात आले. रविवारी समारोपाच्या दिवशी तीनही गटातील उपांत्य व अंतिम फेरीतील सामने खेळविले जाणार असल्याची माहिती तालुका क्रीडा अधिकारी अरुण वावरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
शनिवारच्या सामन्यात संतोष ढोले, सचिन वाल्हेकर, रमेश लव्हाट यांनी पंच म्हणून काम पाहिले.
(तालुका प्रतिनिधी)