नगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात, एका टेबलवर चार कर्मचारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 06:41 PM2024-05-19T18:41:48+5:302024-05-19T18:42:12+5:30
७६८ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अहमदनगर - येत्या ४ जूनला होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी अहमदनगर जिल्हा निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. नगर एमआयडीसीमधील वखार महामंडळाच्या दोन गोदामात अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. यासाठी ७६८ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
४ जूनला सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार आहे. नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ९६ टेबलवर मतमोजणी होणार आहे. असे एकूण १९२ टेबल असणार आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी १६ टेबल असणार आहेत. यामध्ये पोस्टल मतांसाठी दोन टेबल तर ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल असणार आहे.
एका टेबलवर ४ कर्मचारी असणार आहेत. यामध्ये पर्यवेक्षक, सहायक, मायक्रो ऑब्झर्व्हर आणि एक शिपाई असे चार कर्मचारी मतमोजणी प्रक्रिया पार पाडणार आहेत. या आठडाभरात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवडणूक विभागाची पूर्वतयारी सुरु झाली आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तर शिर्डीत २० उमेदवारांमध्ये लढत होती. दोन्ही मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये नगरमध्ये ६६.६१ टक्के म्हणजे १३ लाख २० हजार १६८ मतदान झाले तर शिर्डीसाठी ६३.०३ टक्के म्हणजे १० लाख ५७ हजार २९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला.