नगर तालुक्याची दुष्काळी साडेसाती संपली; ५९ गावात जलयुक्तचे काम, ३५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 04:28 PM2018-01-09T16:28:48+5:302018-01-09T16:29:31+5:30

शासनाची जलयुक्त शिवार योजना नगर तालुक्याला वरदान ठरत असून तालुक्यातील जवळपास ५९ गावांनी यात सहभाग घेऊन दुष्काळावर मात केली आहे. सध्या तालुक्यात एकही टँकर सुरु नसल्याने तालुक्याची वाटचाल टँकर मुक्तीकडे सुरु आहे.

Nagar taluka drought season ended; Water works in 59 villages, under 35,000 hectare area under wetlands | नगर तालुक्याची दुष्काळी साडेसाती संपली; ५९ गावात जलयुक्तचे काम, ३५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

नगर तालुक्याची दुष्काळी साडेसाती संपली; ५९ गावात जलयुक्तचे काम, ३५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

केडगाव : शासनाची जलयुक्त शिवार योजना नगर तालुक्याला वरदान ठरत असून तालुक्यातील जवळपास ५९ गावांनी यात सहभाग घेऊन दुष्काळावर मात केली आहे. सध्या तालुक्यात एकही टँकर सुरु नसल्याने तालुक्याची वाटचाल टँकर मुक्तीकडे सुरु आहे. या योजनेमुळे तालुक्यातील ३५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.
दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या नगर तालुक्याने जलयुक्त शिवार योजना एक पर्वणी मानून केलेल्या कामांचे फळ आता पहावयास मिळत आहे. डिसेंबर महिना संपला की तालुक्यात टँकर सुरु करण्याची लगबग प्रत्येक गावात पहावयास मिळत होती, मात्र यंदा तालुक्यातील एकाही गावात अद्याप टँकर सुरु करण्याची वेळ आली नाही किंवा कोणत्या गावाचा यासाठी अजून प्रस्ताव पंचायत समितीकडे आलेला नाही. १९७२ च्या दुष्काळात तालुक्यात तब्बल २७३ पाझर तलाव बांधण्यात आले. मात्र काळाच्या ओघात हे तलाव गाळाने भरत गेल्याने या तलावांची साठवण क्षमता कमालीची घटत गेली. गावोगावी भूजल पातळी घटत गेली. परिणामी विहिरी व कुपनलिका डिसेंबर संपताच तळ गाठत होत्या. पाणी टंचाईची ही साडेसाती व तीव्र दुष्काळाच्या झळा तालुक्याने वर्षानुवर्षे सहन केल्या. पण जलयुक्त शिवार योजना आता तालुक्याला संजीवनी ठरली आहे.
जलयुक्तच्या योजनेत पहिल्या वर्षी १८ गावांनी ९ कोटी ३१ लाखांची कामे केली. दुस-या वर्षी २१ गावांचा यात सहभाग झाला या गावांनी ४ कोटी रुपयांची कामे केली.यावर्षी २० गावांनी या योजनेत सहभाग नोंदवत जलयुक्तची कामे सुरु केली आहे. यात प्रामुख्याने गावातील नदीचे खोलीकरण व रुंदीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. गुंडेगाव या गावाने हिवरेबाजारचा आदर्श समोर ठेऊन तालुक्यात प्रथम ही चळवळ लोकसहभागातून सुरु करून दुष्काळावर कायमची मात केली. गुंडेगावमध्ये झालेला कायापालट पाहून तालुक्यातील इतर गावांनी या योजनेत सहभागी होऊन लोकवर्गणी तर सरकारच्या आर्थिक मदतीने आपले गाव जलयुक्त करण्यास पुढाकार घेतला.
या योजनेतून बांध बंदिस्ती, नदी खोलीकरण, समतल चर अशी विविध कामे करून पावसाचे वाहून जाणारे पाणी गावातच मोठ्या प्रमाणात अडविण्याचे काम केले. यामुळे मागील वर्षी झालेल्या पावसाने गावातील शिवार जलयुक्त झाले. गावाची पाणी पातळी वाढण्यास मदत मिळाली.

योजनेत सहभागी गावे

निमगाव वाघा, भोयरे खुर्द, गुंडेगाव, पारगाव, भातोडी, हातवळण, वाटेफळ, तांदळी वडगाव, चिचोंडी पाटील, बारदरी, रांजणी, सारोळा बद्धी, जखणगाव, निमगाव घाणा, भोयरे पठार, भोरवाडी, मांजरसुबा, मदडगाव, बाबुर्डी बेंद, खडकी, साकत, दहिगाव, हिवरे झरे,वाळकी, पारगाव मौला, आठवड, कापूरवाडी, अकोळनेर, जाधववाडी, घोसपुरी, सारोळा कासार, पिंपळगाव माळवी, पांगरमल, खोसपुरी, उदरमल, मजले चिंचोली, बहिरवाडी, इमामपूर, धनगरवाडी.

यावर्षी सहभागी गावे

शेंडी, ससेवाडी, डोंगरगण, पोखर्डी, जेऊर, पिंपळगाव उज्जेनी, आव्हाडवाडी, मांडवे,पिंपळगाव, लांडगा, कौडगाव, देऊळगाव सिध्दी, रुई छत्तीसी, उक्कडगाव, बाबुर्डी घुमट, वाडगाव तांदळी, नेप्ती, हिंगणगाव, पिंपळगाव वाघा, कामरगाव, पिंपळगाव कौडा.

नगर तालुक्याने अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा सोसल्या. मात्र जलयुक्तच्या कामामुळे गावे पाणीदार बनत आहेत. याचा परिणाम सकारात्मक होत असल्याने अद्याप कोणत्याच गावाला टँकरची गरज भासली नाही.
-रामदास भोर, सभापती, नगर पंचायत समिती

Web Title: Nagar taluka drought season ended; Water works in 59 villages, under 35,000 hectare area under wetlands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.