नगरच्या कुस्तीपटू भाग्यश्री फंड, धनश्री फंड ‘बेटी बचाओ’ अभियानाच्या प्रचारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 02:22 PM2018-04-02T14:22:47+5:302018-04-02T17:26:08+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील भाग्यश्री फंड व धनश्री फंड या भगिनींनी कमी वयात राष्ट्रीय पातळीवर महिला कुस्तीत दैदीप्यमान कामगिरी केली आहे.
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील भाग्यश्री फंड व धनश्री फंड या भगिनींनी कमी वयात राष्ट्रीय पातळीवर महिला कुस्तीत दैदीप्यमान कामगिरी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने फंड भगिनींची ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानाच्या प्रचारक म्हणून निवड केली आहे.
राज्य शासनाच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, अभियानाच्या प्रचारक म्हणून फंड भगिनींची निवड केल्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे.
भाग्यश्री व धनश्री फंड याा टाकळी लोणार येथील तसेच नाशिक येथे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या हनुमंत फंड यांच्या कन्या आहेत. भाग्यश्रीने खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले असून राष्ट्रीय व राज्य पातळीवरील स्पर्धेत अनेक सुवर्णपदके पटकावली आहेत़ भाग्यश्री ही इयत्ता सातवीत आळंदी येथे शिक्षण घेत आहे. धनश्रीने राज्य तसेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे. धनश्री इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे.
ग्रामीण भागातील फंड भगिनींची अमीर खान यांच्या दंगल चित्रपटाप्रमाणे स्टोरी आहे. या मुलींचे वडिल हनुमंत हे मल्ल आहे. मात्र, नोकरीमुळे त्यांनी कुस्ती सोडली. मात्र, आपले कुस्तीचे स्वप्न मुलींच्या डोळ्यात पेरुन ते त्यांना कुस्तीचे अद्ययावत प्रशिक्षण देत आहेत. पुण्यातील कुस्ती प्रशिक्षक दिनेश गुंड यांच्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रात दोघी सराव करीत होत्या. आता भाग्यश्रीची लखनौ येथे सुरू झालेल्या इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रात निवड झाली आहे. आॅलंपिक कुस्तीगिर साक्षी मलिक हिच्याबरोबर भाग्यश्री सध्या कुस्तीचा सराव करीत आहे.