नगरकरांचे भैया...शिवसेनेचा वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 12:26 PM2020-08-06T12:26:58+5:302020-08-06T12:27:34+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचा बुलंद आवाज असलेले व झुंजार नेता म्हणून ओळखले गेलेले अनिल राठोड यांच्या निधनाने शिवसेनेतील एक वादळ क्षमले. अहमदनगरसारख्या पुरोगामी जिल्ह्यात राठोड यांनी हिंदुत्वाचा झेंडा खंबीरपणे रोवला व संघर्षातून उंचावत नेला. अनेकजण शिवसेनेत आले व आमदारकी, खासदारकी उपभोगून निघून गेले. राठोडांसारखे बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक मात्र आयुष्यभर या विचारासाठीच जगले.
सुधीर लंके/ अहमदनगर
------------------------------
‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, अशा घोषणा बुधवारी नगरमधील चितळे रोडवर घुमत होत्या. पण, यावेळी या घोषणांना एक दु:खाची मोठी किनार होती. ज्या नेत्यासाठी या घोषणा दिल्या जात होत्या, तो नेता त्याच्या अखेरच्या प्रवासाला निघाला होता. हे दृष्य कुणाही शिवसैनिकाचे व सामान्य नगरकरांचे हृदय पिळवटून टाकणारे होते.
--------------------------------------
अनिल राठोड यांच्या निधनाची बातमी ही शिवसैनिकांसाठी धक्का आहेच. पण, ही जिल्ह्याचीही राजकीय हानी आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सेनेचा भगवा हाती देत सर्वसामान्य तरुणांच्या धमन्यांमध्ये ताकद फुंकली व त्यांना विधानसभेत पोहोचविले. भाजी विकणारे, हातगाडी चालविणारे सामान्य लोक त्यांनी निवडणुकीत उतरविले व आमदार केले. ती ताकद बाळासाहेबांमध्ये होती. राठोड हे याच ठाकरे स्कूलचे विद्यार्थी होते.
पदवीधर झाल्यानंतर राठोड हे नोकरीसाठी मुंबई, पुण्यात गेले. पण, तेथे रमले नाहीत. नगरला पावभाजीची गाडी सुरु करुन त्यांनी रोजीरोटी सुरु केली. घरची परिस्थिती अत्यंत सामान्य होती. त्यांचे वडील नगरमध्ये रॉकेल विक्रीचा व्यवसाय करत होते. राठोड यांनीसुद्धा हातगाडीवर रॉकेल विकलेले आहे. असा साधा माणूस नगरचा आमदार झाला. तेही तब्बल २५ वर्षे.
शिवसेनेच्या पूर्वी ते हिंदू एकता आंदोलनाचे काम करत होते. नगरमध्ये हिंदुत्ववादी विचाराचे कोणते चांगले कार्यकर्ते आहेत असा बाळासाहेब ठाकरे यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना राठोड यांचे नाव समजले. राठोड यांना मुंबईला बोलावून घेत त्यांनी त्यांच्या गळ्यात शिवसेनेचा पंचा टाकला. त्यानंतर नगरमध्ये सेनेचे एक वातावरण तयार झाले. डिझेलवारी एक जीपगाडी काढायची व शाखांची उद्घाटने करत फिरायचे, असा राठोड यांचा धडाका होता.
१९९० साली शिवसैनिकांनी व जनतेने आग्रह करुन राठोड यांना विधानसभा निवडणुकीत उतरविले. त्यावेळी ही निवडणूक लढायला कुणीच तयार नव्हते. कारण पैसा आणायचा कोठून? हा प्रश्न होता. राठोड यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास पंधाडे, नरेंद्र पंड्या, पंजूशेठ झव्वर, रतीलाल नहार या आपल्यासोबतच्या कार्यकर्त्यांची त्यावेळी एक समिती गठीत केली व त्यांच्यावर निधीसंकलनाची जबाबदारी सोपवली. लोकांकडून वर्गणी जमा करुन या समितीने त्यावेळी निवडणुकीसाठी पैसा उभा केला.
या निवडणुकीत राठोड विजयी झाले व पुढे २५ वर्षे नगर हा सेनेचा बालेकिल्ला बनला. युतीची सत्ता आल्यानंतर ठाकरे यांनी राठोड यांना मंत्रिपद दिले. राठोड व पंधाडे हे नगरचे असे कार्यकर्ते होते ज्यांना मातोश्रीवर थेट प्रवेश होता. ‘जोडी आहे का तुमची अजून?’ असे बाळासाहेब या दोघांना पाहताच म्हणायचे. ‘काय अनिल कसे चालले आहे तुझे खाते?’ असे बाळासाहेब मंत्रिपदाच्या काळात राठोड यांना आवर्जून विचारायचे. बाळासाहेबांची बायपास झाली त्यावेळी त्यांना दादरला मनोहर जोशी यांच्या घरी ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी बंदी होती. मात्र, याही परिस्थितीत १९९९ ची सेनेची लोकसभेची उमेदवारी अंतिम करण्यासाठी राठोड यांसह पंधाडे, सतीश धाडगे, किशोर डागवाले हे दादरला बाळासाहेबांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी पंधाडे यांना सेनेची नगर लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. परंतु बाळासाहेबांनी ऐनवेळी परवेझ दमानिया यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. बाळासाहेबांचा आदेश मान्य करत या सर्वांनी त्यानंतर पंधाडे यांचा आग्रह सोडला व पक्षादेश पाळला. पुढे दमानिया पराभूत झाले. मात्र, पराभवानंतर दमानिया यांनी राठोडांसह शिवसैनिकांवरच पराभवाचे खापर फोडले. दमानिया यांच्या पराभवास जबाबदार धरत सेनेने वर्षभरातच राठोड यांचे मंत्रीपद काढले. हा त्यांच्यावर अन्यायच होता. मात्र तरीही ते अखेरपर्यंत पक्षासोबतच राहिले. निवडणुकीनंतर दमानिया नगरला कधीच फिरकले नाहीत. राठोड मात्र पक्ष वाढवत राहिले.
चोवीस तास उपलब्ध असलेला मोबाईल आमदार ही राठोड यांची ओळख होती. कुणाही सामान्य माणसाचा फोन आला की पोलिसांअगोदर राठोड यांची मारुती ओमनी हजर, असा शिरस्ताच होता. पूर्वी तर साध्या स्कूटरवर ते शहर फिरायचे. लोक त्यांना आमदार म्हणण्याऐवजी थेट ‘भैया’ म्हणूनच आवाज देत. त्यात एक आपुलकीची भावना होती. संपर्क दांडगा असल्याने त्यांना कार्यकर्ते जमविण्याची गरज पडली नाही. गरिबांसाठी ते सतत धावून गेले. संघटनेसाठी त्यांनी कुटुंबाचीही पर्वा केली नाही.
‘विकास ही प्रशासनाने करायची बाब आहे, मला लोकांनी नगरच्या सुरक्षेसाठी निवडून दिले आहे’, अशी भूमिका ते जाहीरपणे मांडायचे. त्यांच्या या भूमिकेवर टीकाही झाली. मात्र, नगरची सुरक्षा व हिंदुत्व हे दोन मुद्दे त्यांनी अखेरपर्यंत सोडले नाहीत. कोठे भांडणे झाली, राजकीय दहशतीचा प्रयत्न झाला की राठोड लगेच धावून जात. नगर जिल्हा हा मातब्बर नेत्यांचा जिल्हा आहे. आमदार व्हायचे असेल तर आपणाकडे साखर कारखाना व संस्थांचे जाळे असावे, असे बहुतेक नेत्यांना वाटते. राठोड यांना मात्र तसे कधीच वाटले नाही. त्यांच्याकडे ना राजकीय वारसा होता, ना संपत्ती, ना जातीचे पाठबळ. आपल्या जातीची दोन हजार मतेही त्यांच्या पाठीशी नसतील. मात्र, तरीही त्यांनी सलग पाच निवडणुका जिंकल्या. एवढेच नव्हे राठोड यांच्या करिष्म्यामुळे जिल्ह्यातील मातब्बर नेतेही नगर शहरात फारसे लक्ष घालत नव्हते. त्यांच्या करिष्म्याची एक अनामिक भीती होती.
२०१४ मध्ये राठोड यांना विधानसभेला पराभव पत्करावा लागला. शिवसेनेचे कार्यकर्तेही आता प्रचंड महत्त्वाकांक्षी झाल्यामुळे सेनेत पूर्वीचा करिष्मा राहिलेला नाही. त्याचा परिणाम नगरच्या सेनेवरही झाला. सेनेतही फाटाफूट झाली. अनेक निष्ठावान राठोड यांना सोडून गेले. मात्र, राठोड सेनेसाठी अखेरपर्यंत झगडत राहिले. काही प्रसंगात प्रशासन, पत्रकार यांचेसोबतही त्यांचे वाद झाले, खटके उडाले. मात्र, आपला हिंदुत्वाचा अजेंडा त्यांनी सोडला नाही. सतत हिंदुत्ववादी विचारासाठी झगडलेल्या राठोड यांचे राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशीच निधन झाल्याने अनेकजण हळहळले. कोरोनामुळे प्रशासनाची बंधने असल्याने या लोकनेत्याच्या अंतिम दर्शनासाठी त्याचे अनेक चाहते पोहोचू शकले नाहीत ही बाबही सर्वांना चटका लावून गेली.
----
नियतीचा हा दुर्दैवी योगायोग
अयोध्येतील राम मंदिराची भूमिपूजनाची तारीख जाहीर झाल्यानंतर अनिल राठोड यांनी आनंद व्यक्त केला होता. मंदिर व्हावे आणि दर्शनासाठी जाता यावे, हेच जीवनाचे सार आहे. राम मंदिरासाठी जो संघर्ष झाला, त्यात प्राणाची पर्वा न करता सहभागी झालो. त्यामुळे ५ आॅगस्ट हा दिवस माझ्यासाठी समाधानाचा आहे, असे उद्गार राठोड यांनी काढले होते. मात्र दुर्दैवाने याच दिवशी राठोड यांचे निधन झाले. राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा सुरू असताना राठोड हे पंचत्वात विलीन झाले, हा नियतीचा दुर्दैवी योगायोग असल्याची हळहळ शिवसैनिकांनी व्यक्त केली.