रायगडावरील पाखरांना नगरकरांचे बळ
By अरुण वाघमोडे | Published: October 9, 2017 05:43 PM2017-10-09T17:43:14+5:302017-10-09T17:43:54+5:30
अहमदनगर : डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन रायगडावर ताक विकणारी दहा वर्षांची कमल शिंदे, तर छत्रपती शिवरायांचे विचार जगभरात पोहोचविण्याची ...
अहमदनगर : डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन रायगडावर ताक विकणारी दहा वर्षांची कमल शिंदे, तर छत्रपती शिवरायांचे विचार जगभरात पोहोचविण्याची इच्छाशक्ती बाळगणा-या तेरा वर्षांच्या महेश औकिरकरच्या पंखांना बळ देण्याचा निर्णय नगरच्या निरंजन सेवाभावी संस्थेने घेतला आहे़ या दोन्ही मुलांचा सर्व खर्च संस्थेमार्फत करण्यात येत आहे़
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर २० ते २५ कुटुंब छत्रपती शिवाजी महारांच्या कार्यकालापासून वास्तव्यास आहेत़ या कुटुंबीयांचे पूर्वज छत्रपतींच्या सैन्यात मावळे होते असे सांगितले जाते़ गडावर येणा-या पर्यटकांना खाण्यापिण्याच्या वस्तू विकून हे कुटुंब आपला उदारनिर्वाह करतात़ याच कुटुंबातील कमल शिंदे ही इयत्ता पाचवीत शिक्षण घेते़ तिचे आई-वडील गडावरच मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात़ खेळण्याबागडण्याच्या वयात कमलवरही कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याची जबाबदारी आहे़ गडावर दररोज १०० रुपयांचे ताक विकल्यावरच कमल शाळेत जाते़ कमलचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे़ यासाठी तिची कितीही कष्ट करण्याची तयारी आहे़
गडावरच राहणारा दुसरा महेश औकिरकर इयत्ता आठवीत शिक्षण घेतो़ छत्रपती शिवाजी महाराजांवर अतिशय प्रभावी भाषेत आणि खास शैलीत तो व्याख्यान देतो़ शिवाजी महाराजांचे कार्य आणि कर्तृत्व भारत देशासह जगभरात पोहोचावे असे महेश याला वाटते़ या दोन चिमुकल्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्थेच्या नगर शाखेच्या सदस्यांनी निर्णय घेतला आहे़ या दोन्ही मुलांना कायमस्वरूपी दत्तक घेतले असून, त्यांचा सर्व खर्च संस्थेच्या माध्यमातूनच करण्यात येत आहे़ संस्थेचे सदस्य अतुल डागा, किरण मणियार, रविकांत काबरा, प्रसाद बेडेकर, स्वप्नील कुलकर्णी यांसह अनेक नगरकर या उपक्रमात सहभागी आहेत़
६० विद्यार्थ्यांचे पालकत्व
निरंजन सेवाभावी संस्थेने रायगड जिल्ह्यातील हिरकणीवाडी, महाड शाळेतील ६० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे़ या मुलांना शाळेचा गणवेश, बूट, दप्तर, वह्या-पुस्तके आणि वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे़
अनेक गरीब कुटुंबातील मुले केवळ पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहत आहेत़ समाजातील अशाच काही मुलांचे शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल व्हावे याच उद्देशातून निरंजन सेवाभावी संस्थेच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून ‘शैक्षणिक पालकत्व’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे़ सर्वसामान्य कुटुंबातील अनेक मुलांना आपल्या मदतीची गरज आहे़ समाजातील दानशूर व्यक्तींनी आमच्या या कामात हातभार लावावा़
^-अतुल डागा, सदस्य निरंजन सेवाभावी संस्था