नागवडे कारखाना विस्तारीकरणाबाबत साखर आयुक्तांकडे करणार तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:21 AM2021-03-27T04:21:43+5:302021-03-27T04:21:43+5:30
श्रीगोंदा : नागवडे साखर कारखान्यावर २७२ कोटींचा बोजा आहे. कारखान्याची ऊस गाळप क्षमता पाच हजार मेट्रिक टन आहे. प्रत्यक्षात ...
श्रीगोंदा : नागवडे साखर कारखान्यावर २७२ कोटींचा बोजा आहे. कारखान्याची ऊस गाळप क्षमता पाच हजार मेट्रिक टन आहे. प्रत्यक्षात कारखाना सहवीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाही. त्यातच आता पाच हजार मेट्रिक टन विस्तारीकरणाचा निर्णय कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी घेतला आहे. याबाबत साखर आयुक्तांकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती राज्य साखर संघाचे संचालक घनश्याम शेलार यांनी दिली आहे.
नागवडे सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा गुरुवारी ऑनलाइन पार पडली. या सभेत विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी कारखाना निवडणूक बिनविरोध व विस्तारीकरण यावर भूमिका मांडली होती. या सभेत भूमिका मांडण्याची संधी मिळाली नाही, असे म्हणत नागवडे विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन कारखाना कारभारावर हल्ला चढविला. यावेळी शेलार बोलत होते.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर, जिजाबापू शिंदे, रावसाहेब काकडे, मोहन भिंताडे यावेळी उपस्थित होते.
नागवडे साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सभासदांच्या पैशातून स्व. शिवाजीराव नागवडे यांचे स्मारक उभे राहत आहे. या परिसरात टाकण्यात आलेल्या ४२ लाखांच्या मुरुमात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप जिल्हा अण्णासाहेब शेलार यांनी केला.
राजेंद्र नागवडे यांनी स्वतःच्या मालकीचे दोन खासगी कारखाने सुरू केले आहेत. त्यामुळे नागवडे यांना सहकारी साखर कारखान्यात काम करण्याचा नैतिक अधिकार नाही. राजेंद्र नागवडे हे कारखाना निवडणुकीत उमेदवारी करणार नसतील तर आमची ही निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी आहे.
कारखाना बंद असताना कायदा सल्लागार फी ७ लाख ५० हजार रुपये कशी दिली गेली? एफआरपीप्रमाणे पैसे दिले गेले नाहीत. कारखाना अडचणीत असल्याचे सांगितले जाते मग कायदा सल्लागाराची फी कशी दिली, साजन शुगर २३०० रुपये भाव देतो तर नागवडे साखर २१०० रुपयेच भाव कसा देतो, असा सवाल शेलार यांनी केला.
--
भ्रष्टाचारातून घेतले दोन कारखाने...
केशव मगर म्हणाले, राजेंद्र नागवडे यांनी नागवडे साखर कारखान्यात भ्रष्टाचार करून दोन खासगी साखर कारखाने आणि चार टेक्स्टाइल मिल सुरू केल्या आहेत. मग हा पैसा आला कोठून, असा सवाल त्यांनी केला.