नाहाटांनी आरोप सिद्ध करावेत; अन्यथा माफी मागावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:20 AM2021-05-23T04:20:08+5:302021-05-23T04:20:08+5:30
श्रीगोंदा : कुकडीच्या पाणी प्रश्नावर बाळासाहेब नाहाटा यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे व धादांत खोटे आहेत. हे आरोप ...
श्रीगोंदा : कुकडीच्या पाणी प्रश्नावर बाळासाहेब नाहाटा यांनी माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे व धादांत खोटे आहेत. हे आरोप त्यांनी सिद्ध करावेत; अन्यथा जाहीर माफी मागावी. तसे न केल्यास नाहाटांच्या विरोधात
कायदेशीर कारवाई करणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी दिला आहे.
कुकडीच्या पाण्याच्या विलंबास घनश्याम शेलार हे जबाबदार असल्याची टीका बाळासाहेब नाहाटा यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना शेलार बोलत होते. शेलार म्हणाले, प्रशांत औटी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कुकडीच्या आवर्तनावर ६ मे रोजी स्थगिती मिळविली होती. आम्ही तात्काळ ७ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजारी असतानाही त्यांना प्रदीर्घ पत्र देऊन याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी लक्ष घातले.
यासंदर्भात जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे, आमदार रोहित पवार, अतुल बेनके, माजी आमदार राहुल जगताप, अण्णासाहेब शेलार व अन्य सदस्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी मीही उपस्थित होतो. त्यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या विनंतीनुसार प्रशांत औटी यांनी याचिका मागे घेतो म्हणून कबूल केले होते. औटी याचिका जोपर्यंत मागे घेत नाहीत तोपर्यंत जाहीर करू नये, अशी विनंती मी आमदार बबनराव पाचपुतेंना केली होती. त्यांनी श्रेयासाठी पेपरबाजी केली आणि घोटाळा झाला, असा आरोप शेलार यांनी केला.
---
लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारायला हवा
राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष असताना स्वतःच्या सरकारविरोधात कुठलीही तमा न बाळगता कुकडीच्या पाण्यासाठी अनेक आंदोलने केली. खांद्यावर आसूड घेऊन रस्त्यावर उतरलो.
पाणी देण्याची जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची असते. ते ही जबाबदारी का पार पाडत नाहीत? असा प्रश्न त्यांना विचारण्याऐवजी बाळासाहेब नाहाटा यांनी बोलवित्या धन्याच्या इशाऱ्यावर माझ्यावर खोटे आरोप केले. हे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा टोलाही शेलार यांनी लगावला.