बाजार समितीला नाव दादा पाटील शेळकेंचे पण कारभार भलताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:27 AM2021-09-16T04:27:30+5:302021-09-16T04:27:30+5:30
केडगाव : नगर बाजार समितीचे संचालक मंडळ नामधारी असून कारभार दुसरेच पाहतात. आदर्श चाललेल्या संस्था ताब्यात घेऊन त्याच्या जमिनी ...
केडगाव : नगर बाजार समितीचे संचालक मंडळ नामधारी असून कारभार दुसरेच पाहतात. आदर्श चाललेल्या संस्था ताब्यात घेऊन त्याच्या जमिनी विकणे आणि दिसेल तेथे जमिनींवर डोळा ठेवण्याचा उद्योग नगर तालुक्यात सुरू आहे. बाजार समिती नेप्ती उपबाजारात हलवून नगरची जागा विकण्याचा काहींचा डाव आहे. नाव दादा पाटलांचे मात्र कारभार भलताच सुरू असल्याची टीका जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी बाजार समितीच्या नेत्यांवर व संचालक मंडळावर केली.
नगर बाजार समितीला आलेल्या कारणे दाखवा नोटीससंदर्भात तालुका महाविकास आघाडीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जि. प. सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ, माजी संचालक संपतराव म्हस्के, पंचायत समितीचे सभापती संदीप गुंड, माजी सभापती रामदास भोर, उपसभापती दिलीप पवार, माजी उपसभापती रवी भापकर, प्रवीण कोकाटे, गुलाब शिंदे, प्रकाश कुलट, भाऊ तापकीर आदी उपस्थित होते.
संदेश कार्ले म्हणाले , बाजार समितीमधील ज्या मुद्द्यांच्या आधारे नोटीस निघाली त्याला उत्तर देण्याऐवजी व्यक्तिगत टीका केली गेली. आम्ही तक्रारदार असल्यानेच नोटिसा मिळाल्या. आम्ही कधीच सत्तेचा दुरुपयोग केला नाही. उलट भाजपच्या काळात चौकशी झाली. त्यांनीच सत्तेचा वापर करत चौकशी अहवाल दडवून ठेवला. आम्ही दुरूपयोग केला असता तर बाजार समिती केव्हाच बरखास्त झाली असती.
बाळासाहेब हराळ म्हणाले, मी कोणत्या पक्षात आहे याची काळजी करण्यापेक्षा बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी आपला पक्ष कोणता हे सांगावे. दिवसभर भाजपत व रात्री हे राष्ट्रवादीत असतात.
बाबासाहेब गुंजाळ यांनीही टीका केली.