नगरचा गणेशोत्सव डीजेमुक्तीकडे

By Admin | Published: August 10, 2014 11:22 PM2014-08-10T23:22:55+5:302014-08-10T23:29:43+5:30

अहमदनगर : गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणुकीतही डीजे न लावता पारंपरिक वाद्ये वाजविण्याबाबत शहरातील १३ पैकी ११ मंडळांनी तयारी दर्शविली आहे.

Nashik Municipal Council | नगरचा गणेशोत्सव डीजेमुक्तीकडे

नगरचा गणेशोत्सव डीजेमुक्तीकडे

अहमदनगर : गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणुकीतही डीजे न लावता पारंपरिक वाद्ये वाजविण्याबाबत शहरातील १३ पैकी ११ मंडळांनी तयारी दर्शविली आहे. मात्र पहिल्या ११ मंडळांनी डीजेमुक्त उत्सव साजरा करण्याबाबत प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. शिवसेनेच्या मंडळाने प्रतिज्ञापत्र देण्यास नकार दर्शविला आहे. मानाच्या मंडळांनी डीजे न लावण्याचा निर्णय घेतल्याने नगरचा उत्सव यंदा डीजेमुक्त होण्याची शक्यता आहे.डीजे लावल्याने शारीरिक, मानसिक होणारा त्रास, त्याचे परिणाम, ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम याबाबत तज्ज्ञ, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते जागर करीत आहेत. मात्र त्यापासून गणेश मंडळे बोध घेत नसल्याने दरवर्षी डीजे दणदणाट दरवर्षीपेक्षा जास्त होतो. तसेच मंडळांमध्ये डीजे वाजवून तरुणांची गर्दी जमविण्याची स्पर्धा होते. कपिलेश्वर मंडळाचे अध्यक्ष कैलास गिरवले यांनी गेल्या दोन वर्षांपासून डीजेमुक्तीसाठी पुढाकार घेत आहेत. त्यांच्या मंडळाने गतवर्षी पारंपरिक वाद्ये वाजविण्यावर भर दिला होता.
शहरात पूर्वी मानाचे १५ मंडळे होती. त्यापैकी स्पंदन आणि आझाद ही मंडळे मिरवणुकीतून बाद करण्यात आली. राहिलेल्या तेरा मंडळांपैकी ११ मंडळांनी डीजे न लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गिरवले यांच्या पुढाकाराने ११ मंडळांनी प्रतिज्ञापत्रावर सह्या केल्या आहेत. संभाजी कदम यांच्या बंधुंचे समझौता तरुण मंडळ आणि शेवटचे असलेले शिवसेना मंडळ यांनी मात्र प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास नकार दिल्याचे समजते. त्यामुळे डीजेमुक्तीला शिवसेनेचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(प्रतिनिधी)
कोतवाली पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीनंतर बारा मंडळांनी डीजे न लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी शिवसेनेची दोन मंडळे वगळता सर्व ११ मंडळांनी डीजे न लावण्याबाबतच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या केल्या आहेत. सामान्य लोकांच्या आरोग्याचा विचार न करता डीजे लावून तरुणांची गर्दी जमवायची, यासाठी डीजे लावण्याचा शिवसेनेचा आटापिटा आहे. लोकांच्या आरोग्याचा विचार करूनच डीजे बंद करण्याचा निर्णय आहे. कपिलेश्वर मंडळ दोन वर्षांपासून डीजे वाजवित नाही. या उपक्रमाला सर्वांचेच सहकार्य अपेक्षित आहे.
-कैलास गिरवले,
कपिलेश्वर गणेश मंडळ
ध्वनी प्रदूषणाचे परिणाम घातक आहेत. माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू येणे, कर्णबधिरता येणे आदी प्रकारचे आजार जडतात. याशिवाय तरुणांची व्यसनाधिनता वाढीसही डीजेमुळे प्रोत्साहन मिळते. त्यासाठी यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याला शहरातील मंडळे चांगला प्रतिसाद देत आहेत, ही चांगली बाब आहे.
-वाय.डी. पाटील,
उपविभागीय पोलीस अधिकारी
आज निर्णय
सर्वच मंडळांच्या प्रमुखांची रविवारी रात्री साडेनऊ वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. सोमवारी सकाळी सामुहिकपणे डीजे न लावण्याचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.याबाबत पोलीस प्रमुखांनाही मंडळाचे पदाधिकारी भेटून निवेदन देणार असल्याचे समजते. याबाबत कैलास गिरवले यांनीही दुजोरा दिला.
डीजे न लावण्याचा निर्णय त्यांच्या मंडळांनी वैयक्तिकपणे घेतला आहे. याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. प्रत्येक मंडळाने काय देखावे साजरे करायचे, मिरवणुकीत डीजेबाबतचा निर्णय मंडळांचा वैयक्तिक आहे. -संभाजी कदम, शिवसेना शहर प्रमुख

Web Title: Nashik Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.