Nashik: नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची ४ कोटीची फसवणूक
By शेखर पानसरे | Published: March 21, 2023 04:56 PM2023-03-21T16:56:07+5:302023-03-21T16:56:25+5:30
Nashik: बँकेचा शाखा व्यवस्थापक, गोल्ड व्हॅल्युअर आणि बँकेत खोटे सोने तारण ठेवून कर्ज घेणारे अशा एकूण १३६ जणांनी संगनमत करत बँकेची ४ कोटी २० लाख १५ हजार ८६० रुपयांची फसवणूक केली.
- शेखर पानसरे
संगमनेर (जि. अहमदनगर) : बँकेचा शाखा व्यवस्थापक, गोल्ड व्हॅल्युअर आणि बँकेत खोटे सोने तारण ठेवून कर्ज घेणारे अशा एकूण १३६ जणांनी संगनमत करत बँकेची ४ कोटी २० लाख १५ हजार ८६० रुपयांची फसवणूक केली. नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची फसवणूक करण्यात आली असून, येथील शाखेत हा प्रकार घडला. या प्रकरणी सोमवारी (दि. २०) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
योगेश बाळासाहेब पवार (शाखा व्यवस्थापक, नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक, शाखा, संगमनेर रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), जगदीश लक्ष्मण शहाणे (गोल्ड व्हॅल्युअर रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) या दोघांसह बँकेत खोटे सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्या १३६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध नीलेश वसंत नाळेगावकर (शाखाधिकारी, नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.