नाशिक-पुणे महामार्गावर सी.एन.जी. गॅस वाहतूक करणारा टेम्पो उलटला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 10:18 AM2021-12-12T10:18:49+5:302021-12-12T10:22:11+5:30
Accident news : गॅस गळती सुरू झाल्याने पुण्याकडून नाशिककडे जाणारी लेन बंद करण्यात आली होती.
घारगाव (जि. अहमदनगर) - नाशिक- पुणे महामार्गावर पुण्याहून नाशिककडे जाणारा सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या आयशर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कुरकुंडी (ता.संगमनेर) गावच्या हद्दीत पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाला. कमी प्रमाणात गॅस गळती सुरू असल्याने मोठी दुर्घटना टळली. शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणारा सीएनजी गॅस आयशर क्र. (एम. एच. १४ जे. एल. ३१९२) संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी गावच्या हद्दीतून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून आयशर वेगात रस्त्यालगत पलटी झाला. त्यामुळे गॅस गळती सुरू झाली.
घटनेची माहिती समजताच महामार्ग डोळासणे मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांसह कर्मचारी ,घारगाव पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आदिनाथ गांधले , पोलीस कॉन्स्टेबल नामदेव बिरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये चालक अमोल बारवे (रा. वाशीम) हे जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णवाहिकेद्वारे संगमनेर येथे पाठविण्यात आले.
दरम्यान, गॅस गळती सुरू झाल्याने पुण्याकडून नाशिककडे जाणारी लेन बंद करण्यात आली होती. एकेरी वाहतूक सुरू होती. शंभर मीटर परिसरात बॅरिकेट्स लावण्यात आले होते. रात्रभर काहीशा प्रमाणात गॅस गळती सुरू होती. संगमनेर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. रविवारी सकाळी गॅस कंपनीची टीम आल्यानंतर त्यांनी गॅस गळती बंद केली त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.