‘नाथ माझा’ नाटकातच निवडला ‘कलायात्रिकां’नी जीवनसाथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 04:29 PM2020-02-14T16:29:33+5:302020-02-14T16:30:09+5:30
१९८५ साल़ आई-वडिलांनी निवडलेल्या व्यक्तीशीच विवाह करण्याचा दंडक़ प्रेमविवाह तर जवळपास निषिद्धच होता. मात्र, शिरीष आणि सुजाता जोशी यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला. दृष्ट लागावा असा संसार उभा केला.
व्हॅलेंटाईन-डे स्पेशल
१९८५ साल़ आई-वडिलांनी निवडलेल्या व्यक्तीशीच विवाह करण्याचा दंडक़ प्रेमविवाह तर जवळपास निषिद्धच होता. मात्र, शिरीष आणि सुजाता जोशी यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला. दृष्ट लागावा असा संसार उभा केला. त्यांच्या संसारवेलीवर एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन फुले उमलली़ मुला-मुलीला उच्चशिक्षित केले. त्यांनी आता सुखी संसाराची चौतीशी पार केली आहे. दोघेही आता निवृत्त जीवनाचा आनंद लुटत आहेत.
शिरीष अनिल जोशी हे १९७८ साली अर्बन बँकेत नोकरीला रूजू झाले. कॉलेज जीवनापासून त्यांना नाटकांची आवड होती.त्यामुळे बँकेत काम करीत असतानाही ते विविध नाटकांचे प्रयोग करीत होते. १९८५ साली कलायात्रिक या नाट्य संस्थेसाठी निधी उभा करायचा म्हणून गणेशोत्सवात जोशी नाटकांचे प्रयोग करीत़ ‘नाथ माझा’ या नाटकात एका मध्यवर्ती भूमिकेत एक मुलगी काम करायची़ उत्तम अभिनय़ दिसायलाही देखणी़ त्या मुलीचं नाव सुजाता सूर्यकांत शिंदे़.या मुलीवर शिरीष जोशी यांचे मन जडले. त्यांनी सुजाता यांना थेट लग्नाची मागणी घातली. त्यांनीही क्षणाचा विलंब न करता होकार कळविला.
सुजाता यांचे आई-वडील दोघेही डॉक्टर. सुजाता यांच्या वडिलांचे १९८२ साली निधन झाले होते. तर शिरीष जोशी यांचे वडील अनिल नारायण जोशी हे बँकेत होते. शिंदे-जोशी दोन्ही कुटुंबीय सुशिक्षित़ मुलांवरही उत्तम संस्कार केलेले. त्यामुळे सुजाता-शिरीष यांच्या विवाहाला कोणीही अडथळा आणला नाही. १९८६ साली दोघांचा थाटामाटात विवाह झाला. शिरीष जोशी आता बँकेतून निवृत्त झाले आहेत. ३४ वर्षाच्या संसाराच्या गुलाबी आठवणी सांगताना ते म्हणातात, आम्ही नोंदणी पद्धतीने लग्न केले. आम्हाला एक मुलगी, एक मुलगा आहे. दोघेही उच्चशिक्षित आहेत़ मुलाने ‘एम.कॉम., जीडीसी अॅण्ड ए’ तर मुलीने ‘एमसीएम’ पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यावेळी प्रेमविवाह करणे तसे अवघड होते. परंतु आमचे दोघांचेही कुटुंब सुशिक्षित आणि संस्कारी होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबाने आम्हाला स्वीकारले़ प्रेमात राग, लोभ, रुसवा असं सगळं असतं़ त्यातूनच प्रेमाला अधिक गोडी येते़’
-शिरीष -सुजाता जोशी, अहमदनगर.