मुंबईत होणार आमदारांचे राष्ट्रीय संमेलन, १५ ते १७ जूनदरम्यान एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटतर्फे आयोजन
By चंद्रकांत शेळके | Published: June 8, 2023 08:18 PM2023-06-08T20:18:05+5:302023-06-08T20:18:43+5:30
National Conference of MLAs in Mumbai: पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटतर्फे मुंबई येथील बीकेसी जीओ सेंटरमध्ये दि. १५ ते १७ जूनदरम्यान राष्ट्रीय विधायक संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
- चंद्रकांत शेळके
अहमदनगर : पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटतर्फे मुंबई येथील बीकेसी जीओ सेंटरमध्ये दि. १५ ते १७ जूनदरम्यान राष्ट्रीय विधायक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी देशभरातील अडीच हजार आमदार उपस्थित राहतील, अशी अपेक्षा संयोजन समितीने व्यक्त केली आहे.
पद्मश्री पोपटराव पवार, संमेलन संयोजन समितीचे सदस्य योगेश पाटील यांनी गुरुवारी नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत संमेलनाविषयी माहिती दिली. पुणे येथील एमआयटी स्कूल ॲाफ गव्हर्न्मेंटतर्फे हे संमेलन आयोजित केले आहे. भारतातील सर्व विधानसभा व विधानपरिषदेचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहे. नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रिय समाज निर्माण करण्यासाठी भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील २००० पेक्षा अधिक आमदार राष्ट्रीय विधायक संमेलनामध्ये एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर विचारविनिमय करणार आहेत.
राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मिकता व राष्ट्रीय सर्वांगीण शाश्वत विकास या मध्यवर्ती विचार त्रिसूत्रीचा प्रमुख उद्देश ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचे उदघाटन १६ जूनला होईल. तसेच १७ जूनला या संमेलनाचा समारोप होईल. संमेलनात ४० समांतर सत्र आणि गोलमेज परिषद होणार आहे. लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील चाकूरकर, मनोहर जोशी तसेच लोकसभेचे सभापती ओम बिल हे या संमेलनाचे मार्गदर्शक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या विचार चिंतनामधून हे संमेलन होत आहे. संमेलनात सार्वजनिक जीवनातील तणाव व्यवस्थापन, शाश्वत विकासाची साधने आणि प्रभाव, कल्याणकारी योजना, आर्थिक कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि कौतुकास्पद विधानपद्धती, आपला मतदारसंघ विकसित करण्याची कला आणि कौशल्य, आदी विषयांवर मार्गदर्शन, चर्चा होणार आहे.
प्रत्येक सत्रामध्ये ५० आमदार चर्चा करणार आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक सत्राचे अध्यक्षपद विधानसभेचे सभापती, विधान परिषदेचे अध्यक्ष, संसदीय कार्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेता हे भूषविणार आहेत. वेगवेगळ्या राज्यातील आमदारांना एकमेकांमध्ये संवाद घडविणे, सुशासनाच्या मुद्द्यांवर आणि लोकशाहीला शक्तिशाली बनविण्यासाठी संमेलनात चर्चा होईल. त्यामुळे या संमेलनातून देशातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघात शाश्वत स्वरूपाचा सर्वांगीण विकास साधण्याची नवचेतना, नवप्रेरणा, अभिनव व्यापक दृष्टी आणि निश्चित दिशा मिळेल, अशी अपेक्षा संयोजकांनी व्यक्त केली.