दिल्लीतील आंदोलनासाठी राष्ट्रीय समन्वय समिती जाहीर - अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 08:19 PM2018-02-17T20:19:14+5:302018-02-17T20:20:40+5:30

सशक्त लोकपाल, शेतक-यांना न्याय या मुद्यांवर शहीद दिनापासून (२३ मार्च) नवी दिल्ली येथे सुरू होणा-या आंदोलनासाठी राष्ट्रीय समन्वय समिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी जाहीर केली.

National Coordination Committee for Delhi Movement Announced - Anna Hazare | दिल्लीतील आंदोलनासाठी राष्ट्रीय समन्वय समिती जाहीर - अण्णा हजारे

दिल्लीतील आंदोलनासाठी राष्ट्रीय समन्वय समिती जाहीर - अण्णा हजारे

राळेगणसिद्धी : सशक्त लोकपाल, शेतक-यांना न्याय या मुद्यांवर शहीद दिनापासून (२३ मार्च) नवी दिल्ली येथे सुरू होणा-या आंदोलनासाठी राष्ट्रीय समन्वय समिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी जाहीर केली. पहिल्या टप्प्यात २० सदस्यांचा कोअर कमिटीत समावेश करण्यात आला आहे. येत्या २५ फेब्रुवारी रोजी समितीची बैठक दिल्लीत होणार असल्याचे हजारे यांनी सांगितले.
कोअर कमिटीत अक्षय कुमार (उडिशा), कमांडर यशवंत प्रकाश (राजस्थान), कर्नल दिनेश नैन (दिल्ली), मनिंद्र जैन (दिल्ली), विक्रम टापरवाडा (राजस्थान), दशरथ कुमार (राजस्थान), करनवीर थमन (पंजाब), प्रवीण भारतीय (उत्तर प्रदेश), सुनील फौजी (उत्तर प्रदेश), गौरवकांत शर्मा (उत्तर प्रदेश), डॉ. राकेश रफिक (उत्तर प्रदेश), पी.एन. कल्की (उत्तर प्रदेश), सुशील भट्ट (उत्तराखंड), भोपाल सिंग चौधरी (उत्तराखंड), नवीन जयहिंद (हरियाणा), शिवाजी खेडकर (महाराष्ट्र), कल्पना इनामदार (महाराष्ट्र), राम नाईक (कर्नाटक), सेरफी फ्लॅगो (अरुणाचल), सुनील लाल (उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.
अण्णा हजारे म्हणाले, मोदी सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात सक्षम लोकपाल लागू करण्याविषयी लेखी आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर त्याचे पालन तर झाले नाहीच. उलट लोकपाल, लोकायुक्त कायदा कमजोर केला. अशा परिस्थितीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी सक्षम लोकपाल लागू करण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची वेळ आलेली आहे. शेतक-यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या ६० वर्षांवरील शेतक-यांना महिना पाच हजार रुपये पेन्शन मिळावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, यासाठी सत्याग्रहाची गरज आहे, असे ते म्हणाले.

आंदोलनाच्या निधीत पारदर्शकता

कोअर कमिटीशिवाय जनआंदोलन कार्यकर्त्यांनाही प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर व चौकशीअंती ओळखपत्र दिले जाईल. आंदोलनासाठी देणग्या आॅनलाईनने बँक खात्यात स्वीकारून त्याची रीतसर पावती देण्यात येईल. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन संस्थेच्या परवानगीशिवाय कोणी निधी संकलन करण्यास परवानगी नाही. आंदोलनाच्या आवश्यकतेनुसार निधी खर्च करून त्यातील प्रत्येक रुपयाचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे.

ज्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक न लढवता केवळ समाज आणि देशाच्या हितासाठी जीवन समर्पित करण्याचे प्रतिज्ञापत्र करून दिलेले आहे, अशा कार्यकर्त्यांच्या कार्याची माहिती घेऊन विश्वसनीय अशा कार्यकर्त्यांची कोअर कमिटीमध्ये निवड करण्यात आलेली आहे.
-अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.

Web Title: National Coordination Committee for Delhi Movement Announced - Anna Hazare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.