राष्ट्रीय जंतनाशक दिन : एकाच दिवशी १२ लाख जणांना जंतनाशक गोळ्या वाटप
By चंद्रकांत शेळके | Published: February 13, 2024 07:25 PM2024-02-13T19:25:56+5:302024-02-13T19:26:11+5:30
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रामध्ये राबवण्यात आली.
अहमदनगर : लहान मुलांना जंतापासून आतड्याचे आजार होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे विशेष काळजी घेतली जाते. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि. १३) एकाच दिवशी ० ते १९ वर्षांपर्यंतची बालके, शालेय मुले-मुली अशा सुमारे १२ लाख लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रामध्ये राबवण्यात आली. यात एकूण ५ हजार ८८१ अंगणवाडी केंद्रामधून ३ लाख ३२ हजार ६२८ लाभार्थ्यांना, तसेच ५ हजार ४३८ शासकीय, अनुदानित व खासगी शाळांमधून ९ लाख ६० हजार ५३४ शालेय विद्यार्थ्यांना असे एकूण १२ लाख ९३ हजार १६२ लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्याचे नियोजन होते. त्यातील १२ लाखापर्यंत म्हणजे ९० टक्केहून अधिक जणांना एकाच दिवशी या गोळ्यांचे वाटप करण्याची किमया आरोग्य विभागाने केली.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील अंदाजे २८ टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतापासून धोका आहे. आतड्यांतील कृमी दोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणाऱ्या रक्तक्षय व कुपोषणास मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. यामुळे मुला-मुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यातील कामगिरीवर विपरीत परिणाम होतो. तीव्र प्रमाणात कृमी दोष असलेले विद्यार्थी बऱ्याचदा आजारी असतात. त्यांना लवकर थकवा येतो व अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करु शकत नाही. आतड्यांतील कृमी दोष हे वैयक्तीक व परिसर अस्वच्छतेमुळे होतात. बालकांमध्ये याचा प्रसार दूषित मातीद्वारे फार सहजतेने होतो. शाळा व अंगणवाडी पातळीवरुन देण्यात येणारी जंतनाशक गोळी ही फार परिणामकारक आहे.
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा उद्देश १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना अंगणवाडी, शाळा या ठिकाणी जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, तसेच पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे, हा आहे. मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका दवाखाने व महानगरपालिका येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.मंगळवारी शाळेमधील ६ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलां-मुलींना तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये १ ते ६ वर्षे वयोगटातील सर्व मुलां-मुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीने गोळ्या वाटपाचे नियोजन केले. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने ही मोहीम यशस्वी केली.
त्या मुलांना २० फेब्रुवारीला मिळेल गोळी
जे लाभार्थी मंगळवारी आजारी होते किंवा इतर कारणामुळे त्यांना गोळी घेणे शक्य झाले नाही, त्यांना २० फेब्रुवारी रोजी शाळा व अंगणवाडी केंद्रामध्ये गोळी देण्यात येणार आहे.