नटबोलट : अष्टपैलू नट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:46 PM2018-11-11T12:46:08+5:302018-11-11T12:46:13+5:30
गेली ३५ वर्षे नगरच्या हौशी रंगभूमीवर अभिनेता ते तंत्रज्ञ अशा विविधांगी भूमिका निभावणारे परंतु कायम प्रसिद्धीपासून दूर असलेले
गेली ३५ वर्षे नगरच्या हौशी रंगभूमीवर अभिनेता ते तंत्रज्ञ अशा विविधांगी भूमिका निभावणारे परंतु कायम प्रसिद्धीपासून दूर असलेले, ज्यांना शासकीय, राजकीय तसेच राज्यातील विविध संस्थांच्या वतीने तब्बल ३६ राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले, असे नाट्यकलाकार म्हणजे दीपक बडवे़ गेल्या ३४ वर्षांपासून ते हौशी रंगभूमिवर अभिनय, नेपथ्य व इतर तांत्रिक बाजू सांभाळत आहेत.
नाटक या क्षेत्रात नव्याने येणारे कलाकार स्थिर होत असताना त्यांनी रंगभूमीचा चौफेर अभ्यास करावा आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे, यामुळे त्यांचा प्रवास योग्य दिशेने होईल. नवीन पिढीला नाटकाचा इतिहास आणि आणि ज्येष्ठ कलाकार, तंत्रज्ञ आणि लेखक माहिती असायला हवे़ कारण कोणत्याही सोयी-सुविधा नसताना त्यांनी केलेली रंगभूमीची सेवा नि:स्वार्थ होती. असेच नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व म्हणजे दीपक बडवे.
१९८४ साली त्यांनी नाट्य क्षेत्रात सहभाग घेण्यास सुरुवात केली. ज्येष्ठ रंगकर्मी शैलेश मोडक यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘खोटं नाटक’ या एकांकिकेत त्यांनी भूमिका केली. मोडक हे दीपक बडवे यांचे नाट्य गुरु आहेत.
‘काळोख देत हुंकार’ आणि ‘मसीहा’ या नाटकासाठी नेपथ्याचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक त्यांना प्राप्त झाले आहे. यासह ‘नीरो, हमीदाबाईची कोठी, रंग उमलत्या मनाचे, डॉ. हुद्दार, हातचा एक, अंदमान, गांधी ते गोध्रा, मोदी अँड मोदी’ या नाटकांचे नेपथ्य बडवे यांनी केले़ ‘वºहाड आलंय नगरला, खोटं नाटक (७० प्रयोग), चिऊताई चिऊताई दार उघड (३५ प्रयोग), होस्ट, टोप्यांचा बाजार, पोखरीचे लेकरं, मैत, डोमकावळे, तप्त दाही दिशा, मथुरेचा बाजार, तृष्णा, द स्ट्रेट स्टेट, मन वैशाखी श्रवण डोळे, मानसीचा शिल्पकार’ यासह अनेक नाटक आणि एकांकिकेत त्यांनी भूमिका, नेपथ्य तर कधी रंगमंच व्यवस्था केली आहे. त्यांच्या कविता अनेक मासिके, वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत़ आकाशवाणीवरही त्यांच्या कवितांचे सादरीकरण करण्यात आले आहे़ शासनाच्या वतीने, दारुबंदी, हुंडाबंदी, साक्षरता अभियान, स्त्री जन्माचे स्वागत या विषयावरील ५०० च्या वर पथनाट्यात त्यांनी ग्रामीण व शहरी भागात विनामोबदला काम केले आहे. दूरचित्रवाहिनीवरील ‘गिधाड, फुकट घेतला शाम’ या मालिकेत त्यांनी भूमिका केली आहे. राज्य नाट्य स्पर्धेत संयोजन समितीमध्ये त्यांनी काम केले आहे़ अनेक नाटकांची रंगमंच व्यवस्था सांभाळली आहे. प्राथमिक आणि अंतिम फेरीत भूमिका केल्या आहेत. नवरात्र उत्सव, गणेश उत्सव, महापौर करंडक, अरुणोदय करंडक यासारख्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या संयोजन समितीमध्येही त्यांचा सहभाग राहिला आहे़ बीएसएनएलमध्ये नोकरी करणारे बडवे यांनी तिथेही सांस्कृतिक चळवळ रुजवली आहे़ विदूषक, कॉलेज अशा काही एकांकिका तिथे त्यांनी सादर केल्या.
नाटक, पथनाट्य, काव्य वाचन, वक्तृत्व, पर्यावरण या सर्वच क्षेत्रात त्यांनी काम केले आहे. स्वत:च्या लग्नातील खर्च कपात करून काही रक्कम कारगील जवानांच्या मदतीसाठी दिली. रक्तदान, वृक्षारोपण, गरजूंना ब्लँकेट वाटप असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. सतीश लोटके, श्याम शिंदे, शशिकांत नजान, प्रताप ठाकूर, कै. शशिकांत गटणे या मित्रांनी मला नवनवीन प्रयोग करण्यास मदत केली़ नवीन पिढीला नेपथ्य आणि अभिनय याबाबत मार्गदर्शन करण्याची इच्छा आहे. मुलगा तेजसची साथ मिळते म्हणून मी या क्षेत्रात यशस्वी आहे, असे बडवे सांगतात.
शशिकांत नजान, (लेखक नाट्य दिग्दर्शक व अभिनेते आहेत.)