नवीकोरी पंचायत समिती धूळखात
By Admin | Published: August 5, 2016 11:39 PM2016-08-05T23:39:03+5:302016-08-05T23:43:47+5:30
हेमंत आवारी, अकोले अकोले: पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या तरी विद्यमान पंचायत समिती सदस्य मंडळाच्या नशिबी नव्या इमारतीत बसण्याचा योग दिसत नाही.
हेमंत आवारी, अकोले
अकोले: पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या तरी विद्यमान पंचायत समिती सदस्य मंडळाच्या नशिबी नव्या इमारतीत बसण्याचा योग दिसत नाही. इमारतीचे उद्घाटन होऊन दोन वर्षे लोटली, परंतु फर्निचर व विद्युतीकरणाचे काम बाकी असल्याने जवळपास तीन कोटींची ही इमारत धूळखात पडून आहे.
सन २०१२-२०१७ साठी पंचायत समिती सदस्य मंडळ निवडून आल्यानंतर नव्या इमारतीची पायाभरणी झाली. इमारत बांधकाम कामानिमित्त पंचायत समिती कार्यालय मराठी मुलांच्या शाळेत हलवावे लागले. २०१४ला ३ कोटी रूपये खर्चून आकर्षक वास्तू उभी राहिली. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर घाईतच इमारतीचे उद्घाटन २३ आॅगस्ट २०१४ ला तत्कालीन पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते झाले.
दरम्यान इमारतीच्या अंतर्गत विद्युतीकरणासाठी ३० ते ४० लाख रुपये निधी प्राप्त झाल्यावर औरंगाबादच्या ठेकेदाराने विद्युतीकरणाचे काम सुरु केले होते पण कामाच्या दर्जाचे कारण पुढे होत हे काम बंद पडले. औरंगाबादच्या ठेकेदाराला काम सोडून निघून जावे लागले.
नंतर इमारत बांधकाम करणाऱ्या ठेकेदारालाच विद्युतीकरणाचा ठेका मिळाला असून अद्याप कामाचे आदेश निर्गमीत झालेले नाहीत. तसेच दोन वर्षांपासून फर्निचरसाठी पैसे मिळत नसल्याचे कारण होते. आता फर्निचरसाठी ५८ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. तरी अद्याप फर्निचरचे काम सुरु झालेले नाही. तसेच फर्निचरसाठी अधिकचे ४० लाख रुपये मंजूर आहेत. इमारतीत ९८ लाख रुपयांचे फर्निचर होणार असून हे काम दर्जेदार व्हावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
तीन कोटीची इमारत, एक कोटीचे फर्निचर, चाळीस लाखांचे विद्युतीकरण असे काम तालुक्यातील एकाच ठेकेदारास मिळून देखिल चार वर्षे इमारतीचे काम पूर्ण न झाल्याबद्दल पंचायत समिती आवारात नाराजीचा सूर उमटत आहे. सध्या पंचायत समितीचा कारभार नारी भवनमध्ये सुरु आहे. महिला सबलीकरणासाठी ही इमारत तयार झाली असून या इमारतीचा वापर तालुक्यातील महिला बचत गटांनी उत्पादीत केलल्या वस्तू विक्रीसाठी होणे अपेक्षित आहे.
मात्र तालुक्यातील महिला बचतगट चळवळीतील महिलांना ही इमारत आपल्यासाठी आहे हेच माहीत नाही. पंचायत समितीचा कारभार सध्या विखुरलेल्या ठिकाणाहून सुरु आहे. येथील एका कोपऱ्यात सभापती, उपसभापतींसाठी टेबल ठेवले आहेत. सभापती निवासमध्ये लघू पाटबंधारे विभाग, पंचायत समिती हॉलच्या एका छोट्या खोलीत आरोग्य विभाग, तर गट समूह साधन इमारतीत शिक्षण विभागाचे कामकाज सुरु आहे. नव्या इमारतीचे काम रेंगाळत पडले असून पाच वर्षे पूर्ण होत आले तरी पंचायत समिती सदस्य मंडळाच्या नशिबी नव्या इमारतीत बसण्याचा योग दिसत नाही.
नारी भवनमधून पंचायत समितीचे कामकाज सुरळीत सुरु आहे. नव्या इमारतीच्या फर्निचरसाठी ५८ लाख रुपये प्राप्त असून अधिक ४० लाख रुपये मिळणार आहेत. विद्युतीकरणासाठी पहिल्या ठेकेदाराचे काम रद्द झाले असून नवीन ठेकेदारास काम मंजूर झाले. पण कार्यारंभ आदेश मिळालेले नाहीत. विद्युतीकरणासाठी निधी मंजूर आहे. फर्निचर व विद्युतीकरणाचे काम लवकर सुरु होणे अपेक्षित आहे.
- अंजना बोंबले, सभापती, पंचायत समिती