सलग आठ दिवस उभे राहून भक्तांची नवसपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 02:08 PM2019-10-05T14:08:39+5:302019-10-05T14:12:38+5:30
शेवगाव तालुक्यातील भावीनिमगावचे ग्रामदैवत जगदंबा मातेचा शारदीय नवरात्रौत्सव ‘खडी नवरात्र’ म्हणून ओळखला जातो. ही येथील जुनी परंपरा आहे. हे भाविक उपवास काळात रात्रंदिवस उभे राहतात. आधारसाठी केवळ काठी घेतात. अलीकडील काळात युवकही हे उपवास करू लागले आहेत. झोपण्यासाठी टांगलेला झोपाळा (चोफाळा) वापरला जातो.
नानासाहेब चेडे ।
दहिगावने : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगावचे ग्रामदैवत जगदंबा मातेचा शारदीय नवरात्रौत्सव ‘खडी नवरात्र’ म्हणून ओळखला जातो. ही येथील जुनी परंपरा आहे. हे भाविक उपवास काळात रात्रंदिवस उभे राहतात. आधारसाठी केवळ काठी घेतात. अलीकडील काळात युवकही हे उपवास करू लागले आहेत. झोपण्यासाठी टांगलेला झोपाळा (चोफाळा) वापरला जातो.
घटस्थापनेपासून दसºयापर्यंत पंचाक्रोशीतील भाविक ‘खडी नवरात्रीचा उपवास करतात. उपवास करणारे भक्त आपले सर्व व्यवहार उभ्यानेच पार पडतात. आधार म्हणून हातात सतत काठी असते. झोपण्यासाठी टांगलेला झोपाळा (चोफाळा) वापरला जातो. एक पाय झोपाळ्यावर व एक पाय कायम जमिनीवर ठेवलेला असतो. ‘खडी नवरात्रा’चा हा उपवास ज्येष्ठांसह तरुणाईही मोठ्या संख्येने धरते. आठ दिवस देवीचा उपवास आणि एका दिवसाचा बालाजीचा उपवास ठेऊन दस-याच्या दिवशी उपवास सोडला जातो.
राज्य शासनाच्या ‘क’ वर्ग देवस्थानात असणारे हे जगदंबा मातेचे मंदिर हेमाडपंथी आहे. सुमारे सातशे वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे. मंदिर स्थापत्यकलेचा आदर्श नमुना व वास्तुकलेचा अनमोल असा ठेवा आहे. मंदिरामध्ये जगदंबा माता देवीचा भव्य तांदळा आहे. मंदिराला भव्य कळस असून त्यावर असणा-या देवतांच्या मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेतात. मंदिर आजही सुस्थितीत असून हिंदू संस्कृतीचे एक अनमोल असे भूषण आहे. मंदिरालगतच पुरातन बारव आहे. भाविनिमगावचा उल्लेख नवनाथ ग्रंथामध्ये भामानगर म्हणून केलेला आहे. राज्यभरात देवीच्या नावावरून या गावाची ‘देवीनिमगाव’ अशी ओळख आहे. राजमाता अहिल्यादेवींनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता, असे सांगितले जाते. कुणी या देवीला माहुरची रेणुका तर कुणी जगदंबा माता, भवानी, भोन्याई म्हणून संबोधतात. शनिवारी सातव्या माळेला देवीचा भव्य यात्रौत्सव असून मंदिर व्यवस्थापनाने व ग्रामस्थांनी भाविकांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली आहे.