नवरात्र स्पेशल : महिलांना आर्थिक बळ देणारी ‘अंबिका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:54 AM2018-10-10T11:54:43+5:302018-10-10T11:54:55+5:30
सहकाराचे उगमस्थान म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात महिलांनीही एक पाऊल पुढे टाकत ४ जानेवारी १९८८ रोजी दि.अंबिका महिला सहकारी बँकेची स्थापना केली.
अरूण वाघमोडे
अहमदनगर: सहकाराचे उगमस्थान म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यात महिलांनीही एक पाऊल पुढे टाकत ४ जानेवारी १९८८ रोजी दि.अंबिका महिला सहकारी बँकेची स्थापना केली. गेल्या ३१ वर्षात उत्कृष्ट ग्राहकसेवा, विश्वासार्हता, आणि पारदर्शी कारभाराच्या बळावर या बँकेने उत्तुंग भरारी घेत सर्वसामान्य महिलांचे आर्थिक केंद्रस्थान म्हणून लौकिक मिळविला आहे. या यशाचे सर्व श्रेय बँकेच्या कारभारणींनाच जाते.
या बँकेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि सभासद महिलाच आहेत. बँकेची ध्येयधोरणे महिलाच ठरवितात.उत्कृष्ट कामकाजासाठी या बँकेला आजपर्यंत विविध नामांकित संस्थांकडून १२ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या नगर जिल्ह्यात महिलांसाठी स्वतंत्र बँक नव्हती. सहकारमहर्षी स्व. ह. कृ़ तथा बाळासाहेब काळे यांनी त्यांच्या सूनबाई प्रा़ मेधाताई काळे यांना महिलांसाठी बँक स्थापन करण्याची प्रेरणा दिली. मेधाताई यांनी सहकारी महिलांना ही संकल्पना सांगून थेट कामाला प्रारंभ केला. नगर शहराचे सर्वेक्षण करून रिझर्व्ह बँकेला प्रस्ताव सादर केला. रिझर्व्ह बँकेने बँक सुरू करण्यासाठी कमीतकमी ७०० सभासद आणि ३ लाखांचे भागभांडवल जमा करण्याची अट घातली. मेधाताई काळे आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी अवघ्या दीड महिन्यात २ हजार ९४ सभासदांची नोंदणी करून ३ लाख ७५ हजार रूपयांचे भागभांडवल जमा केले आणि नगर शहरात जिल्ह्यातील पहिली महिला सहकारी बँक अस्तित्वात आली. या बँकेच्या आज शहरात चार शाखा असून ५ हजार ८८५ महिला सभासद आहेत. बँकेचा एकूण ११५ कोटी रूपयांचा व्यवसाय आहे. आजपर्यंत ५ हजार १२० सभासदांना कर्जवाटप करण्यात आले आहे. आरबीआयचे प्रथम श्रेणीचे निकष पूर्ण करून बँकेचा कारभार चालतो. येणा-या काळात ग्राहकांना सर्व आधुनिक बँकिंग सेवा, एटीएमसेवेसह जिल्ह्यात बँकेचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे या बँकेच्या अध्यक्षा पुष्पलता वाघ यांनी सांगितले.
या आहेत बँकेच्या कारभारणी
मेधा काळे (संस्थापक संचालिका), पुष्पलता वाघ (अध्यक्षा), सरोजिनी चव्हाण (उपाध्यक्षा), पुष्पा मरकड (संस्थापक संचालिका), संध्या जाधव (संस्थापक संचालिका), लता फिरोदिया (संस्थापक संचालिका) इतर संचालक सदस्यांमध्ये क्रांती अनभुले, आशा मिस्किन, सुमन गोसावी, शांता मोरे, शारदा लगड, शोभना चव्हाण, सविता गांगर्डे यांचा समावेश आहे.
महिलांना उद्योग उभारणीला आधार
अंबिका महिला बँकेच्या माध्यमातून महिलांना छोटे-मोठे उद्योग उभारणीसाठी कर्ज दिले जाते. बँकेच्या आर्थिक पाठबळामुळे नगर शहरातील शेकडो महिलांनी स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत. महिला बचत गटाच्यावतीने तयार केलेल्या उत्पादनाचे प्रदर्शनही बँकेच्यावतीने भरविले जाते. या प्रदर्शनामुळे अनेक बचत गटांना आर्थिक आधार मिळाला आहे.
महिलांनी स्थापन केलेली अंबिका महिला बँक आज बँकिग क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असून, महिलांसाठी आर्थिक आधार ठरली आहे. उत्कृष्ट ग्राहकसेवा आणि पारदर्शी कारभार हेच ध्येय ठेवून गेली ३१ वर्षे महिलांनी जिद्द आणि सचोटीने कारभार केला आहे. बँकेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, संचालिका, कर्मचारी वर्ग, सभासद आणि ठेवीदार यांचे मोठे योगदान आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश गायकवाड यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे बँकेने गेल्या काही वर्षात नेत्रदीपक प्रगती केली आहे. महिलांचा आर्थिक विकास हेच या बँकेचे ध्येय आहे.- प्रा.मेधा काळे, संस्थापक संचालिका