निळवंडे शिवारात जलवाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 03:18 PM2019-09-13T15:18:58+5:302019-09-13T15:19:53+5:30
तळेगाव दिघे भागातील २० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणा-या तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची लोखंडी जलवाहिनी निळवंडे गावादरम्यान गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास फुटली.
तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे भागातील २० गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणा-या तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची लोखंडी जलवाहिनी निळवंडे गावादरम्यान गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास फुटली. जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. प्रवाशांनी यानिमित्ताने पाण्याचे हवेत उडणारे फवारे पाहण्याचा आनंद लुटला.
तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे वीस लाभार्थी गावांना पिण्याचे पाणी पुरविले जाते. योजनेच्या वडगावपान शिवारातील साठवण तलावापासून तळेगाव दिघे गावाकडे जमिनीतून गेलेली जलवाहिनी गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास निळवंडे गावादरम्यान फुटली. जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे हवेत उडणारे कारंजे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. रस्त्याच्या साईड गटारात पाणीच पाणी साचल्याचे दिसून आले. रस्त्याच्या जलवाहिनी फुटल्याचे समजल्यानंतर पाणी पुरवठा बंद करण्यात आला. मात्र तोपर्यंत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला होता. सदर लोखंडी जलवाहिनी ठिकठिकाणी अत्यंत जीर्ण झाली आहे. जीर्ण जलवाहिनी वारंवार फुटते. त्यामुळे लाभार्थी गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.