निलेश लंके यांच्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 07:29 PM2019-01-08T19:29:52+5:302019-01-08T19:31:35+5:30
शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निलेश लंके आपल्या मनगटावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.
पारनेर : शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निलेश लंके आपल्या मनगटावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांचा प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. पुढील महिन्यात पारनेर येथील मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होणार असल्याची माहिती आहे.
पारनेरचे शिवसेनेचे आमदार विजय औटी व शिवसेनेचे तत्कालीन तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्यात मागील वर्षी मतभेद झाले होते. तसेच २७ फेब्रुवारीस आ.औटी यांच्या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाहनावर लंके समर्थकांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर लंके यांची तालुकाप्रमुख पदावरून व शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. या प्रकारानंतर लंके यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार औटी यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.
शरद पवार, अजित पवारांसोबत बैठक
पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादीचे मधुकर उचाळे, अशोक सावंत, पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार यांनी निलेश लंके यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्याबरोबर बैठक घडवून आणली. यावेळी लोकसभेच्या आधी सक्रिय होण्याचा संदेश निलेश लंके यांना देण्यात आला. त्यानुसार मागील आठवड्यात परत राष्ट्रवादीचे नेते व लंके यांच्यात बैठक झाली. त्यात पुढील महिन्यात पारनेर येथे प्रवेश मेळाव्याचे नियोजन करण्यात आले.
मधुकर उचाळे यांचे डावपेच
लंके यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी मधुकर उचाळे यांनी पैलवान पध्दतीने डाव टाकल्यानंतर लंके पक्ष प्रवेशासाठी तयार झाले. यामुळे मात्र राष्ट्रवादीचे सुजित झावरे, अभिषेक कळमकर, उदय शेळके पेचात सापडले आहेत.
निलेश लंके यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशाबाबत कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून निर्णय होईल. लंके यांना विधानसभेत पाठविण्यासाठी एखाद्या पक्षाचा झेंडा हाती घ्यावा लागेल. -दादा शिंदे, अध्यक्ष, निलेश लंके प्रतिष्ठान.