भाजपाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने नगरमधील दिल्लीगेट येथे तळले पकोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 06:49 PM2018-02-12T18:49:16+5:302018-02-12T19:02:54+5:30
बेरोजगार तरुणांनी नोक-या मिळत नसतील तर पकोडे विकावे, असे वक्तव्य भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने नगरमधील दिल्लीगेट येथे पकोडे तळून भाजपाचा निषेध केला.
अहमदनगर : बेरोजगार तरुणांनी नोक-या मिळत नसतील तर पकोडे विकावे, असे वक्तव्य भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने नगरमधील दिल्लीगेट येथे पकोडे तळून भाजपाचा निषेध केला.
देशातील तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडेतीन वर्षात तरुणांना नोक-या दिल्या नाहीत. पण बेरोजगार तरुणांचा अपमान केला जात आहे. अमित शाह यांनी एका कार्यक्रमात नोक-या मिळत नसतील तर बेरोजगार तरुण पकोडे विकू शकतात, असे वक्तव्य केले होते. हा तरुणांचा अपमान आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे यांनी केली. या निषेध आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, युवकचे अध्यक्ष अभिजीत खोसे, सरचिटणीस प्रा. सीताराम काकडे, शारदा लगड, राजश्री मांढरे, सागर गुंजाळ, ऋषिकेश ताठे, मयूर चव्हाण, शुभम वाल्हेकर, रोहन शिरसाठ, विकास दिघे, इम्रान शेख, तन्वीर मन्यार, सनी साठे, पिंटू कोकणे, निर्मला जाधव, अरुणा बोरा, उषा मकासरे, अपूर्वा पालवे, रेखा भोईटे, लता गायकवाड, अलका पगारे, गायत्री ठोंबरे, भारती भोसले, गंगूबाई गवळी, वैशाली गुंड, दीपाली कन्होरे आदी उपस्थित होते.
दिल्लीगेट येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलांनी भजे तळून सरकारचा निषेध म्हणून लोकांना त्याचे वाटप केले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत महिलांनी सरकारी धोरणावर टीका केली.
या सरकारकडून वारंवार संविधानाचा अपमान केला जात आहे़ घोषणाबाजीशिवाय सरकार काहीही करीत नाही़ निवडणुकीच्या वेळी आणि नंतरही अनेकदा बेरोजगारांना रोजगार देण्याचे आमिष दाखविण्यात आले. मात्र, सरकारने हे आश्वासन कधीच पाळले नाही. त्याउलट बेरोजगारांचा अपमान करण्यात आला़ याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करीत आहोत.
-प्रा. माणिक विधाते, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी