राष्ट्रवादी भाजपची खुन्नस काढतेय; चंद्रकांत पाटलांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 05:15 PM2020-03-01T17:15:16+5:302020-03-01T17:42:20+5:30
भाजप व शिवसेनेत रक्ताचे नाते आहे. सध्याचे सरकार चालवणा-या राष्ट्रवादीला मात्र भाजपाची खुन्नस काढायची आहे. राष्ट्रवादी शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती खुन्नस काढत आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.
शिर्डी : भाजप व शिवसेनेत रक्ताचे नाते आहे. सध्याचे सरकार चालवणा-या राष्ट्रवादीला मात्र भाजपाची खुन्नस काढायची आहे. राष्ट्रवादी शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून ती खुन्नस काढत आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी रविवारी (दि.१ मार्च) दुपारी शिर्डीत साईदर्शन घेतले. साईदर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या पाच वर्षात युती सरकारने घेतलेले जलयुक्त शिवारसारखे अनेक लोकोपयोगी निर्णय रद्द करण्यात येत आहेत. हे निर्णय घेतांना मागील सरकारमध्ये आपणही होतो, याचा शिवसेनेला विसर पडला आहे. सध्याचे सरकार कोण चालवत आहे याचा शिवसेनेने विचार करायला हवा़ आमचे विरोधी पक्ष म्हणून बरे चाललेय. शिवसेना सरकारमध्ये असूनही अस्वस्थ आहे का? त्यांनाच विचारा. हिंदुत्व सोडून ते समाधानी असतील तर जनताच निर्णय घेईल. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे भिमा-कोरेगावचा तपास केंद्राकडे सोपविण्याचा निर्णय घेतात. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार त्याला विरोध करतात. अनेक निर्णयामध्ये या तिन्ही पक्षात एकवाक्यता नाही. भाजप हे सरकार पाडणार नाही. तशी गरजही नाही. आपसातील विसंवादामुळेच हे सरकार आपोआप कोसळेल, असा दावाही पाटील यांनी केला.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ़ भागवत कराड, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, गजानन शेर्वेकर, किरण बो-हाडे, डॉ.राजेंद्र पिपाडा, भाऊराव देशमुख, प्रा़राम बुधवंत आदींची उपस्थिती होती.
कर्जमाफी योजना फसवी
अवेळी पडलेल्या पावसाने नुकसान झालेल्या ९४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्याची जाहीर केल्याप्रमाणे नुकसान भरपाई व शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सध्याची कर्जमाफी योजना फसवी आहे, असा आरोपही पाटील यांनी केला. देशातील मुस्लिमांचा वापर राजकारणासाठीच केला जात आहे. आरक्षणाचे लॉलीपॉप दाखवून त्यांना भाजपाच्या विरोधात रस्त्यावर उतरवले जात असल्याची टिकाही त्यांनी केली़.