महापालिकेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:15 AM2021-07-01T04:15:32+5:302021-07-01T04:15:32+5:30

अहमदनगर : शिवसेना-राष्ट्रवादीने आघाडीच्या एकीचा नारा देत, महापालिकेत सत्ता स्थापन केली. महापौरपदी सेनेच्या रोहिणी शेंडगे यांची, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे ...

NCP is now in a difficult position in the Municipal Corporation | महापालिकेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड

महापालिकेत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड

अहमदनगर : शिवसेना-राष्ट्रवादीने आघाडीच्या एकीचा नारा देत, महापालिकेत सत्ता स्थापन केली. महापौरपदी सेनेच्या रोहिणी शेंडगे यांची, तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता पाठोपाठ आता गणेश भोसले यांच्या रूपाने उपमहापौरपदही राष्ट्रवादीकडे आले आहे. त्यामुळे महापालिकेतील राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ऑनलाइन सभेमुळे महापौर निवडीच्या वेळी महापालिकेत प्रथमच शुकशुकाट पाहायला मिळाला.

महापौर, उपमहापौर निवडीसाठी बुधवारी ऑनलाइन सभा झाली. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची नेमणूक करण्यात आली होती. सभागृहात आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त प्रदीप पठारे, नगरसचिव एस.बी. तडवी, महापौरपदाच्या उमेदवार रोहिणी शेंडगे, तर उपमहापौरपदाचे उमेदवार गणेश भोसले उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला महापौरपदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. महापौरपदासाठी शेंडगे यांचे चार अर्ज प्राप्त झाले होते. शेंडगे यांचे चारही अर्ज वैध ठरले. त्यानंतर, उपमहापौरपदासाठी प्राप्त अर्जांची छाननी केली गेली. भोसले यांचे तीनही अर्ज वैध ठरविण्यात आले. अर्ज माघारीसाठी रीतसर १५ मिनिटांचा वेळ प्रशासनाकडून देण्यात आला. माघारीची वेळ संपल्यानंतर प्रथम महापौरपदी रोहिणी शेंडगे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर, उपमहापौरपदासाठी भोसले यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांच्याही बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. जिल्हाधिकारी भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.

महापौर व उपमहापौर निवडीनंतर महापालिका परिसरात फटाके वाजून जल्लोष केला जातो. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यावेळी मात्र महापालिकेत कुठल्याही प्रकारचा जल्लोष केला गेला नाही. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, प्रशासनाकडून तशा सूचना देण्यात आल्या होत्या. महापालिका आवारात मोठ्या संखेने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. निवडीनंतर पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली व मोजक्या कार्यकर्त्यांसह महापालिकेतून बाहेर पडले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापौर व उपमहापौर निवडीच्या वेळी कमालीची शांतता पाहायला मिळाली. सेनेच्या वतीने तारकपूर येथील एका हॉटलसमोर गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.

.......

माघारीवरून सभागृहात हास्यकल्लोळ

सभा ऑनलाइन असल्याने सभागृहात उमेदवारांशिवाय कुणीही उपस्थित नव्हते. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक उमेदवार असल्याने केवळ औपचारिक घाेषणा करण्यासाठी ही सभा होती. पीठासन अधिकारी भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला होता. ही वेळ सुरू झाल्यानंतर भोसले यांनी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ कमी आहे, मन पालटते का, असा सवाल केला. त्यावर भोसले म्हणाले, ‘मला अर्ज मागे घ्यायचा नाही. महापौरांना विचारा,’ असे मिश्कील उत्तर दिल्याने सभागृहात एकच हशा पिकला.

....

ना गुलाल ना फटाक्यांची आतषबाजी

महापौर व उपमहापौर निवडीची घोषणा झाल्यानंतर, कार्यकर्त्यांकडून जल्लोष होत असतो. कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांचीही दमछाक होते. यावेळी मात्र कुठलाही गोंधळ झाला नाही. फटाकेही वाजले नाहीत. महापालिका परिसरात गुलालही कुणी उधळला नाही. शांततेत पार पडलेली ही महापालिकेची पहिली निवडणूक असेल.

....

महापालिकेच्या महापौरपदाची संधी मिळाली आहे. महापालिकेचे अनेक प्रकल्प रखडलेले आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल.

- रोहिणी शेंडगे, महापौर

......

नगर शहर व परिसरात वृक्षलागवडी देऊन हरितनगर करण्याला प्राधान्य देणार असून, महापालिकेची पाणी योजना, अमृत भुयारी गटार योजना, यांसारख्या रखडलेल्या प्रकल्पांना गती देणार आहे, तसेच महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावून सामान्यांचे कामे वेळेत मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील.

- गणेश भोसले, उपमहापौर

....

भाजप तटस्थ

गतवेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. महापालिकेत भाजपचे १५ नगरसेवक आहेत. महापौरपदासाठी भाजपकडे उमेदवार नव्हता. सेना व राष्ट्रवादीत ऐन वेळी फाटाफूट होईल, अशी आशा भाजप नगरसेवकांना होती, परंतु सेना व राष्ट्रवादीने जुळवून घेतल्याने भाजपचे महत्त्व कमी झाले. उपमहापौर निवडणुकीत विरोधक म्हणून भाजप आपली भूमिका बजावू शकत होते, परंतु भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने उपमहापौरपदाची निवडणूकही बिनविरोध झाली.

.....

सेनेचा दुसरा गटही सहभागी

महापौर निवडणुकीच्या सुरुवातीला सेनेतील गटबाजी उफाळून आली होती. अखेरच्या टप्प्यात विरोधी गटाची तीव्रता कमी झाली. महापौर निवडणुकीनंतर सेनेचे दोन्ही गट एकत्र आल्याचे प्रकर्षाने जाणवले. दोन्ही गटांच्या नगरसेवकांनी तारकपूर येथील हॉटेलमध्ये गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

..

Web Title: NCP is now in a difficult position in the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.