भाजप विरोधात राष्ट्रवादी सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:18 AM2021-01-18T04:18:57+5:302021-01-18T04:18:57+5:30
अहमदनगर : जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली आहे. जिल्ह्यातील तालुका मतदारसंघात सक्षम उमेदवार देऊन विरोधकांसमोर ...
अहमदनगर : जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली आहे. जिल्ह्यातील तालुका मतदारसंघात सक्षम उमेदवार देऊन विरोधकांसमोर तगडे आव्हान उभे करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची याबाबत नुकतीच बैठक झाल्याचे समजते.
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम सोमवारी जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर नगरविकास राज्यमंत्री प्रजक्ता तनपुरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची राष्ट्रवादी भवनात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. जिल्ह्यातील कुठले तालुके राष्ट्रवादीकडे घेता येतील, घटक पक्षांचे प्राबल्य असलेले तालुके कुठले आहेत, याबाबत चाचपणी करण्यात आली. बहुतांश तालुक्यांची जबाबदारी आमदारांवर सोपविण्यात आली आहे. भाजपच्या नेत्यांना त्यांच्याच तालुक्यात अडकून ठेवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न दिसतो. काही तालुक्यांत इतर पक्षातून उमेदवार आयात केले जाण्याची शक्यता आहे. आयारामांना उमेदवारी देऊन भाजप नेत्यांविरोधात आव्हान उभे केले जाईल. भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची भूमिका जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महत्त्वाची असणार आहे. कर्डिले हे नगर तालुक्याचे नेतृत्व करतात. त्यांच्याविरोधात सक्षम उमेदवार देण्याबाबत तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांशीही प्राथिमक चर्चा झाल्याचे समजते.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित मुंबईत बैठक झाली. या बैठकीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीची जबाबदारी राष्ट्रवादीने नगरविकास मंत्री प्रजाक्त तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार अशुतोष काळे, उदय शेकळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जिल्हा बँकेत या नेत्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत घटक पक्षांशी चर्चा करून उमेदवारी दिली जाणार आहे. उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
...
भाजपात सामसूम
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी सरसावली आहे. जिल्ह्यात काँग्रेस व शिवसेना या दोन घटकपक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीचे प्राबल्य अधिक आहे. काँग्रेसचे संगमनेर व श्रीरामपूर या दोन तालुक्यांतच आमदार असले तरी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भूमिका निवडणुकीत महत्वाची असणार आहे. भाजपाकडून माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे व शिवाजीराव कर्डिले यांच्यावर जबाबदारी आहे. परंतु, भाजपमध्ये अद्याप तरी शांतातच असल्याने हे नेते काय रणनीती आखतात, याची उत्सुकता आहे.